दुकानांना लावणार टीबी फ्री शॉपचे स्टिकर
ठाणे 2 – दिवाळीच्या निमित्त मिठाई दुकानात वाढती गर्दी लक्षात घेता, ठाणे महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग नियंत्रण विभागामार्फत क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. यात शहरातील सर्व मिठाई दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे टीबी स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. डिजिटल एक्स-रे मशीनमुळे तत्काळ त्या आजाराबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये ज्या दुकानांमध्ये कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंग होईल त्या दुकानांना टीबी फ्री शॉप चे स्टिकर लावण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षी क्षयरोग आजाराचे ८ हजार ५०० हून अधिक रुग्ण वर्षभरात आढळले होते. त्यात १४ जणांची मृत्यूही झाला होता. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत ७ हजार ५५६ रुग्ण या आजाराचे आढळून आले आहेत. त्यात या आजाराने ५ जणांचा मृत्यु झाला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यातच येत्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे.ग्राहकांची शहरातील नामांकीत दुकानात मिठाई घेण्यासाठी गर्दी होणार आहे. परंतू मिठाई घेत असतांना त्याठिकाणाहून आजार तर ग्राहक घरी घेऊन येत नाहीत ना? याची काळजी महापालिकेचा आरोग्य विभाग घेणार आहे.