ठाणे, 3 : ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात प्रवेश करताना सर्व प्रवेशद्वारे ही शहराची ओळख करुन देणारी, प्रतिनिधित्व करणारी असावीत. तलावांचे शहर म्हणजे ‘सिटी ऑफ लेक’ ही ओळख अधोरेखित व्हावीत अशा पध्दतीने प्रवेशद्वारांची मांडणी असावी अशा सूचना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आढावा बैठकीदरम्यान सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
ठाणे शहरात आनंदनगर, खारीगांव, गायमुख, डायघर, भिवंडी, विटावा, पलावा, कशेळी या ठिकाणी ठाण्यात प्रवेश करता येणारी मुख्य ठिकाणे आहेत. या सर्व ठिकाणची प्रवेशद्वारे उभारताना ती लक्षवेधी असावीत, ठाणे शहराचे प्रतिनिधीत्व करणारा संदेश असावा. सदरची प्रवेशद्वारे ही शहराची आहेत, त्यामुळे शहरातील लोककला, लोकसंस्कृती, लोकजीवन हे सर्व त्यावर अपेक्षित असून तलावांचे शहर अशी जी ओळख आहे त्याचे प्रतिबिंब त्यावर उमटले पाहिजे त्या दृष्टीकोनातून सर्व प्रवेशद्वारांचे काम करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना बैठकीत आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, रस्ते आणि शौचालयांची स्वच्छतांची कामे सुरू आहेत. सर्व प्रभाग समितीअंतर्गत सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. बहुतांश प्रभाग समितीतील सौंदर्यीकरणाची कामे ही पुर्णत्वाच्या मार्गावर असून उर्वरित कामांची गती वाढवून सदरची कामे 15 जानेवारीपर्यत पूर्ण करण्याचे निर्देशही श्री. बांगर यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले.
*स्वच्छतागृहाच्या सफाईचा बदल दृश्यस्वरुपात दिसायला हवा*
सर्व प्रभाग समितीमधील सार्वजनिक शौचालयांची पाहणी करुन शौचालयामध्ये छतावरच्या टाकीद्वारे पाणी उपलब्ध असणे हे शौचालय स्वच्छ राहण्यासाठी तसेच नागरिकांच्या सोईसाठी अत्यंत आवश्यक आहे. तरी ज्या शौचालयांवर पाण्याच्या टाक्या नाहीत, अशी शौचालये निश्चित करुन अशा शौचालयावर पाण्याच्या टाक्या बसवून नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. ज्या शौचालयांवर इमारतीची क्षमता नसल्यामुळे टाकी बसविणे शक्य नाही अशा शौचालयांवर जमिनीपासून लोखंडी अँगल उभारुन पाण्याच्या टाक्या बसवाव्यात, जर पाण्याचे कनेक्शन देणे शक्य नसेल तर बोअरवेल उपलब्ध करुन देण्यात यावी. सर्व शौचालयात दिव्यांग व्यक्तींना सहज प्रवेश करता येईल् अशा पद्धतीने रॅम्प उपलब्ध करुन द्यावेत. ज्या ठिकाणी कडीकोयंडे तुटलेले असतील ते दुरूस्त करुन घ्या. सार्वजनिक शौचालयांसाठी दिशादर्शक फलक अत्यंत महत्वाचे असून त्यांची उपलब्धतता करण्याबरोबरच भिंतींवर सूचनादर्शक फलक असावेत या द्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती करणे सोईचे होईल.
*स्टॉर्मवॉटर लाईन्सची झाकणे तातडीने बसवावीत*
ज्या ठिकाणी पावसाळी गटाराचे चेंबर (स्टॉर्मवॉटर लाईन्स) ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणचे मशीनहोल उघड्या अवस्थेत असतील किंवा झाकणांची दुरावस्था झाली असेल तर तातडीने त्या ठिकाणी झाकणे बसविण्याची कार्यवाही करावी. जर एखादी दुर्घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरुन कारवाई केली जाईल असा इशारा देत याबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.
*नागरिकांना प्रतिसाद द्या*.
ठाणे शहरातील जागरुक नागरिकांनी शहरातील कामासंदर्भात तक्रार केल्यास सदरची समस्या प्राधान्याने सोडवा तसेच त्याचा अभिप्रायही द्या. तसेच जेव्हा लोकप्रतिनिधींकडून आलेल्या तक्रारींना गांभिर्यांने घेवून त्यावर कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.