Tuesday, January 21 2020 9:05 pm

शर्मिला राज ठाकरे आज सांगली-कोल्हापूर मधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

सांगली – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. तसेच पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलेला दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आजपासून पूरग्रस्त भागाचा दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्यात त्या सर्वप्रथम सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ या गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर त्या सांगली शहरातील पुरग्रस्तांशी भेटून समस्या जाणून घेणार आहेत. त्यानंतर मिरज शहरालाही भेट देणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीला भेट देऊन कराडकडे रवाना होणार असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, आज शर्मिला ठाकरे यांनी पुरात मोठं नुकसान झालेल्या कराड येथील पाटण कॉलनीला भेट देऊन तिथल्या पुरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. त्यावेळी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच आम्हाला मदत केल्याचं गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं. सध्या सांगली तसेच कोल्हापुरातील अनेक भागात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तळ ठोकून आहेत. मुंबई आणि संपूर्ण राज्यातील मनसेच्या शाखांमधून मागील आठवडाभर गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने पाठवला जात असून, स्थानिक कार्यकर्ते त्या वस्तू पूरग्रस्तांना वाटत आहेत.

राज्यातील सत्ताधारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निरनिराळ्या यात्रा काढण्यात पुन्हा व्यस्त झाले असून, केवळ घोषणा करून आणि तुटपुंज्या मदत करून भरमसाट जाहीरबाजी करण्यात मग्न आहेत. मात्र त्या तुलनेत विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी सांगली आणि कोल्हापूरकरांच्या मदतीला धावले आहेत.