Sunday, April 18 2021 11:26 pm

शरद पवारांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून ते घरी विश्रांती घेत आहेत. यामुळे शरद पवारांनी निवासस्थानीच कोरोनाचा दुसरा डोस घेतला. यावेळी सुप्रिया सुळे, डॉक्टर लहाने उपस्थित होते.

शरद पवार यांनी स्वत: ट्विट करत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली आहे. शरद पवारांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!”.

शरद पवारांनी यावेळी लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन कोरोनाविरोधातील लढाईत सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. “योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असं ते म्हणाले आहेत.

याआधी शऱद पवारांनी १ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात जाऊन त्यांनी करोनाची लस घेतली होती.