Friday, December 13 2024 12:15 pm

व्व्हॉट्सॲप, ट्वीटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचा आता डायल ११२ मध्ये समावेश

पुणे,१४ :- प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे.

या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे साडेअकरा लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या असून, यातील सुमारे 2.50 लाख तक्रारी या महिलांशी संबंधित होत्या.

या प्रणालीतून सरासरी दररोज 19 हजारावर कॉल्स स्वीकारले जातात, तर 2800 तक्रारींचा निपटारा केला जातो. आता यात महाराष्ट्र पोलिसांचे सिटीझन पोर्टल, एसओएस, फेसबुक, ई-मेल, सिटिझन मोबाईल ॲप, ट्विटर आणि व्हॉट्सॲप इत्यादी माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जलदगतीने तक्रारींचा निपटारा शक्य होणार आहे.