नागपूर – 28 वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आयुष्यात स्थिरता यावी त्यांना सोयी सवलती मिळाव्यात यासाठी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कार्यररत व्हावे याकरता जानेवारी 2023 मध्ये राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाईल, लवकरच वृत्तपत्र विक्रेत्यांचा कल्याणकारी मंडळाचा प्रश्न मार्गी लावू. नव्या वर्षात वृत्तपत्र विक्रेत्यांना कल्याणकारी मंडळाची भेट नक्की देऊ असे आश्वासन वृत्तपत्र विक्रेत्यांचे मार्गदर्शक ठाणेचे आमदार, भाजपचे जेष्ठ नेते संजय केळकर यांनी दिले. आमदार श्री केळकर हे अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर शहरात आहेत, श्री केळकर यांनी या दरम्यान नागपूर शहरातील विविध वृत्तपत्र सेंटरला भेट दिली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नागपूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रमेश नागलकर यांनी आमदार श्री केळकर यांचे स्वागत केले.
श्री केळकर यांनी वृत्तपत्र सेंटरवरील विक्रेत्यांशी संवाद साधला. वृत्तपत्र विक्रेत्यांचे दिनक्रम त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. लोकशाहीचा महत्त्वाचा घटक समजला जाणाऱ्या वृत्तपत्र क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक वृत्तपत्र विक्रेते असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले.
श्री केळकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने गेली अनेक वर्ष वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी पाठपुरावा सुरू आहे. आपणही याबाबत विधानसभेत व राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आदेशानुसार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल तयार करून शासनास सादर केलेला आहे. हा अहवाल स्वीकारून लवकरात लवकर वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ गठित होणे गरजेचे आहे. त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीत आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकारी शिष्टमंडळासह याबाबत जानेवारी 2023 मध्ये कामगार मंत्र्यांसमवेत बैठकीचे आयोजन करणार आहोत. वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न मी जवळून अनुभवले आहेत त्यामुळे हे कल्याणकारी मंडळ होण्यासाठी मी कामगार मंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरेन व लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन श्री केळकर यांनी दिले. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रमेश नागलकर ,सचिव राकेश आकरे , उपाध्यक्ष अशोक वाटेकर , राम पांडे ,दिनेश हडवार ,पवन सहारे,आरिफ खान आदी पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.