मुंबई,04 – अदानी कंपनीला वीज वितरणाची परवानगी देण्यात येऊ नये या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.
आज (4 जानेवारी) वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर राज्यातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला होता.वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले होते.
कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला गेला होता.रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरीत रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्याकरिता महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना या संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे.
महावितरणतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत अशा एजन्सीना तात्काळ बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले असून वीजपुरवठा सुरळित ठेवण्यासाठी ज्याठिकाणी साहित्याची आवश्यकता भासणार आहे.अशा ठिकाणी साहित्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण संपूर्ण काळजी घेत असून याउपरही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. 1800-212-3435/1800-233-3435/1912/19120 यावर संपर्क साधावा, असे महावितरणने जाहीर केलं होतं.
महाराष्ट्राला वीज कुठून मिळते?
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ म्हणजेच MSEB या संस्थेतर्फे महाराष्ट्रात वीज पुरवली जायची. 2003 नंतर या संस्थेचं विभाजन झालं आणि चार कंपन्या स्थापन झाल्या. त्यानुसार महाजनको कंपनी वीजनिर्मितीची जबाबदारी सांभाळतं.Electricity act 2003 या कायद्यान्वये या कंपनीची स्थापना झाली आहे. 15 सप्टेंबर 2005 पासून कंपनी अस्तित्वात आली.