Monday, June 17 2019 4:33 am

विस्तारित ठाणे स्थानकासाठी आरोग्य विभागाच्या जागेचा निर्णय लवकरच

 पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. दीपक सावंत यांच्याकडील बैठकीत ठाणे महापालिकेने दिले ३ प्रस्ताव

तातडीने निर्णय घेण्याची केली मागणी

 सकारात्मक निर्णय घेण्याचे आरोग्य खात्याचे संकेत

मनोरुग्णालयाच्या जागेवरील प्रस्तावित रेल्वे स्थानकाला आरोग्य खात्याने जागा देण्याच्या बदल्यात ठाणे महापालिकेने टीडीआर, बिल्डेबल एफएसआय अथवा अन्यत्र जागा असे तीन पर्याय आरोग्य विभागासमोर ठेवले आहेत. या तिन्ही पर्यायांचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

ठाणे स्थानकावरील भार कमी व्हावा, यासाठी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानक व्हावे, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मनोरुग्णालयाच्या एकूण जागेपैकी १४ एकर जागा या विस्तारित रेल्वे स्थानकासाठी लागणार आहे. यापैकी चार एकर जागा अतिक्रमित असून १० एकर जागा मोकळी आहे. रेल्वे मंत्रालयाने या स्थानकाला मंजुरी दिली असून केवळ आरोग्य खात्याकडून जमीन ताब्यात मिळणे शिल्लक आहे.

यासंदर्भात पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या पुढाकाराने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात शुक्रवारी झालेल्या बैठकीला श्री. शिंदे यांच्यासह खा. विचारे, आरोग्य खात्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, आरोग्य संचालक सतीश पवार, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, आरोग्य खाते आणि ठाणे महापालिकेचे अन्य वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

आरोग्य खात्याला जागेचा मोबदला म्हणून टीडीआर देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने यापूर्वीच दिला होता. शुक्रवारी झालेल्या बैठकीत अन्यत्र जागा किंवा बिल्डेबल एफएसआय असे आणखी दोन प्रस्ताव महापालिकेच्या वतीने देण्यात आले. या तिन्ही प्रस्तावांचा अभ्यास करून नेमका कोणता पर्याय आरोग्य खात्याला मान्य होईल, याचा तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.