Saturday, January 18 2025 7:13 am
latest

विष्णूपुरी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीसाठी १२५ कोटी रुपये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, २३ नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील विष्णूपुरी प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या उपसा सिंचन प्रकल्पाला 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या प्रकल्पाच्या पंप व उद्धरण नलिका कामाच्या विशेष दुरुस्तीसाठी 125 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

यासंदर्भात सदस्य श्यामसुंदर शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पावरील पंप जुने झाल्यामुळे दुरुस्तीची कामे वारंवार उद्भवत आहेत. तसेच उद्धरण नलिकेचे आयुर्मान जास्त झाल्याने त्यांची झीज झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकल्पाच्या पंप व उद्धरण नलिका कामाचे विशेष दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरू असून हे अंदाजपत्रक राज्य शासनास प्राप्त झाल्यानंतर त्यास मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येईल. येत्या 3 महिन्यात सर्व परवानगी प्राप्त करून निविदा काढण्यात येतील, अशी ही माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अशोक चव्हाण यांनी सहभाग घेतला.