Wednesday, April 23 2025 1:49 am

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 25 व 26 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष मोहीम

ठाणे, 6):- मा. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात दि.०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत सुधारीत कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात दि.२५ नोव्हेंबर २०२३ (शनिवार) व दि. २६ नोव्हेंबर २०२३ (रविवार) या दिवशी देखील विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.
वरील दोन्ही दिवशी ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसेच विशेषतः असंरक्षित आदिवासी गट (Particularly Vulnerable Trible Groups-PVTGs) अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी आणि मतदार यादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कदम यांनी केले आहे.
दोन दिवसात ४ हजार १६२ दावे, हरकती प्राप्त
दि.०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत सुधारीत कार्यक्रमानुसार ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात दि.०४ नोव्हेंबर २०२३ (शनिवार) व दि.०५ नोव्हेंबर २०२३ (रविवार) या दिवशी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मोहिमांमध्ये जिल्ह्यातील सर्व ६ हजार ५२४ मतदान केंद्राच्या २ हजार ५४२ पदनिर्देशित ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद नोंदविला आहे. विधानसभा मतदारसंघातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी नवीन मतदार नोंदणीसाठी दि. 04 नोव्हेंबर 2023 रोजी नमुना 6 – 1 हजार 260, नमुना 7 – 44, नमुना 8 – 185 असे एकूण 1 हजार 489 दावे व हरकती प्राप्त झाल्या आहेत. तर दि. 05 नोव्हेंबर 2023 रोजी नमुना 6 – 2 हजार 304, नमुना 7 – 66, नमुना 8 – 303 असे एकूण 2 हजार 673 दावे, हरकती प्राप्त झाल्या आहेत.
या दोन दिवसात नमुना 6 च्या 3 हजार 564, नमुना 7 चे 110 आणि नमुना 8 चे 488 असे एकूण 4 हजार 162 दावे व हरकती प्राप्त झाल्या आहेत. निवडणूका न्याय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारयाद्यांचे अद्यावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. त्यानुषंगाने या मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.