ठाणे, 13 :- भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण मतदार संख्येत 79 हजार 562 एवढी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटात 19 हजार 394 नवीन मतदारांची वाढ झाली असून 20 ते 29 वयोगटातील मतदार संख्येत 30 हजार 471 ने वाढ झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीत मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनासाठी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठका घेऊन मतदार नोंदणी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी पाठपुरावा करून मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
प्रारुप मतदार यादीत जिल्ह्यात 33 लाख 28 हजार 9 पुरुष व 28 लाख 6 हजार 93 महिला आणि इतर 853 असे एकूण 61 लाख 34 हजार 955 एवढे मतदार होते. अंतिम मतदार यादीत ही संख्या 79 हजार 562 ने वाढून पुरुष 33 लाख 67 हजार 120 मतदार, महिला 28 लाख 46 हजार 319 व 1078 इतर असे एकूण 62 लाख 14 हजार 517 मतदार झाले आहेत.
विशेष म्हणजे अंतिम यादीनुसार जिल्ह्यात युवा मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 9 नोव्हेंबर 2022 रोजीच्या एकत्रिकृत प्रारुप मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील 26 हजार 705 मतदार होते. 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीत ही संख्या 19 हजार 394 ने वाढून 46 हजार 99 एवढी झाली आहे. तसेच 20 ते 29 वयोगटातील प्रारुप यादीत 9 लाख 90 हजार 984 मतदारांची नोंदणी होती. अंतिम यादीत ही संख्या 30 हजार 471 ने वाढून 10 लाख 21 हजार 455 एवढी झाली आहे.
17 वर्षांवरील 17 हजार 388 भावी मतदारांनी केली नोंदणी
मतदार संख्या वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या चार अर्हता दिनांक घोषित केल्या आहेत. तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 दरम्यान 17+ भावी मतदारांच्या नाव नोंदणीसाठी विशेष समर्पित सहायक मतदार नोंदणी अधिकारी नेमण्यात आले होते. त्यांच्यामार्फत मोहिम राबवून युवा मतदारांची नोंदणीसाठी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे जिल्ह्यात 17 वर्षे पूर्ण झालेल्या भावी मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून जिल्ह्यात एकूण 17388 युवकांनी विधानसभा मतदारसंघ स्तरावर अर्ज केले आहेत.