Wednesday, December 2 2020 5:30 am

विधापरिषद आमदारकीसाठी १० कोटी द्या – भाजप नगरसेवकाला गंडा घालणाऱ्या तिघांना अटक

ठाणे:”नमस्कार मुख्यमंत्री महोदयांकडून बोलतोय, येत्या काही महिन्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर तुमची वर्णी लावतो, दहा कोटी रुपये द्या”, अशी बतावणी करत खुद्द भाजप नगरसेवकालाच गंडा घालणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. येथील घोडबंदर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक दोनचे भाजप नगरसेवक असलेल्या मनोहर डुंबरे यांची या टोळक्याने फसवणूक करण्याचा डाव रचला होता. मात्र याआधीच आरोपींना २५ लाखांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केल्याने या प्रकरणावरील पडदा उठला.
मागील पालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपच्या गोटात सामील होऊन नगरसेवक झालेल्या मनोहर डुंबरे यांना आमदारकीचे वेध लागल्याची चर्चा सुरु होती. त्यातूनच महिला आरोपी अनुद शिरगांवकर (२९), अनिलकुमार भानुशाली (३१), अब्दुल्ला अन्सारी (२४) यांनी डुंबरे यांना थेट संपर्क साधून विधान परिषद आमदारकीचे ‘गाजर’ दाखवले. यामध्ये अनुद हिने १९ मार्च रोजी डुंबरे यांना संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी तुमचा बायोडेटा अँप्रूव्ह केल्याचे सांगत दुसऱ्या लाईनवर खुद्द मुख्यमंत्री असून त्यांच्याशीच बोला असे सांगितले. यावेळी आरोपी अब्दुल्ला याने मुख्यमंत्र्यांची हुबेहूब नक्कल करत डुंबरे यांना आर्थिक व्यवहाराबाबत संबंधित महिलेशी बोलण्यास सांगितले. मात्र या प्रकारात काळंबेरं असल्याची शंका डुंबरे यांना आल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना मेसेज करून शहानिशा केली. यावेळी अशाप्रकारे मी कोणालाही आमदारकी देण्यासाठी नेमले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करताच या प्रकरणातील सत्यता समोर आली. अखेर गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक संजू जॉन, पोलीस उप निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने या टोळीला घोडबंदर रोड येथील तुलसी हॉटेलमधून ताब्यात घेतले.