Wednesday, August 12 2020 9:52 am

विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती नाही: प्रकाश आंबेडकर

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना भाजपा युती होण्याची चर्चा असताना  वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही.  असं ‘वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केले असून  वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होत आहे.  भारिप बहुजन महासंघ व ‘एमआयएम’च्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली होती. औरंगाबादमध्ये आघाडीचा खासदारही निवडून आला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ला विशेषत: प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरू केले होते. मात्र, राष्ट्रवादीला वगळून काँग्रेससोबत युती करण्यात आंबेडकरांना रस होता. त्यासाठी त्यांनी थेट ५० टक्के जागांची मागणी काँग्रेसकडं केली होती. त्याला काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आंबेडकरांनी आज ‘एकला चालो रे’चा नारा देत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली.

अनंत चतुर्दशीनंतर ‘वंचित’च्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असं आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. ‘१४४-१४४ जागांचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसपुढं ठेवला होता. मात्र, त्यास काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आम्ही आता चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य जे पक्ष येतील, त्यांना सोबत घेऊ,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.