Monday, January 27 2020 1:56 pm

विधानसभा निवडणुका पुढे ढकला;राज ठाकरेंची मागणी

मुंबई :-  कोल्हापूर-सांगलीतील  पूरस्थिती लक्षात घेता दोन तीन दिवसात हि परिस्थिती नियंत्रणात येणार नाही अशा परिस्थिती मध्ये राज्यात कोणत्याही निवडणुका घेणं माणुसकीला धरून होणार नाही. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक पुढं ढकलावी,’ अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली.

कोल्हापूर-सांगली येथे पूरपरिस्थितीत  मदत आणि पुनर्वसन कामात सरकारी अधिकारी व्यस्त असतील. हे काम लवकर पूर्ण होईल असं दिसतं नाही. त्याला वेळ लागेल. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास या सरकारी अधिकाऱ्यांच्या कामावर त्याचा ताण पडेल. त्यामुळे ही एकूण परिस्थिती लक्षात घेत विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, असं राज ठाकरे म्हणाले.
राज्यातील पुराच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘पूरग्रस्त भागात लोकांना घरे नाहीत. अन्नधान्य नाही. हे सगळं सावरणं इतकं सोपं नाही. सरकारनं मदत व बचावकार्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. त्यासाठी निवडणुका पुढं ढकलणं गरजेचं आहे. अन्यथा आचारसंहितेकडं बोट दाखवून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम थांबवलं जाऊ शकतं. हे टाळण्यासाठी निवडणूक पुढं ढकलायला हवी. केंद्र सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करायला हवा,’ असं ते म्हणाले. या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचंही राज यांनी स्पष्ट केलं.