मुंबई 27: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व माजी विधानपरिषद सदस्य राजेंद्र पाटणी यांचे २३ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. आज विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडताना सांगितले की, मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी येथे झाला. मनोहर जोशी यांनी कोहिनुर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. १ रुपयात झुणका भाकर, झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे यांसारख्या योजना त्यांनी मोठ्या धाडसाने राबविल्या असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शोकप्रस्तावात म्हटले.
तसेच राजेंद्र पाटणी यांचा जन्म १९ जून १९६४ रोजी वाशिम येथे झाला. त्यांचे बी.कॉम पर्यंत शिक्षण झाले होते. राजेंद्र पाटणी यांचा वाशिम जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांशी निकटचा संबंध होता. त्यांनी अनेक संस्थांच्या अध्यक्षपदावरून उत्तम कार्य केले असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शोकप्रस्तावात सांगितले. यावेळी सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.