Thursday, December 12 2024 7:07 pm

विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आजी-माजी सदस्यांसाठी परिसंवादासह स्नेहमेळावा

मुंबई, 9- विधानपरिषदेतील सदस्यांनी भाषणांद्वारे व्यक्त केलेली व्यापक लोकहिताची भूमिका आजही सर्वांना मार्गदर्शन करणारी आहे. सदस्यांनी लोकहितासाठी वेळोवेळी सभागृहात आपली मते अभिव्यक्त केली आणि त्यातूनच लोकहिताचे अनेक क्रांतिकारी कायदे तयार झाले. त्यामुळे विधान परिषदेतील कामकाजात आजी व माजी सदस्यांचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि माजी विधानपरिषद सदस्यांसाठी परिसंवाद आणि स्नेहमेळावा मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होते.

याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे आजी – माजी सदस्य, विधिमंडळाचे सचिव श्री. जितेंद्र भोळे, विधिमंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, विधान परिषदेतील सदस्य हे चळवळीतून वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेली असतात. समाजमनाचा अचूक मागोवा घेऊन सभागृहात बोलत असतात. त्यांच्या योगदानामुळेच रोजगार हमी कायदा, स्त्री भ्रूणहत्या कायदा, प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन कायदा, डान्सबार बंदी कायदा, माहितीचा अधिकार यासारखे समाजाचे जीवनमान उंचाविणारे कायदे करण्यात विधान परिषदेने मोठे योगदान राहिले आहे.सदस्यांचा कालावधी संपला म्हणजे काम संपत नाही. अनेक समित्यांवर सदस्य काम करत असतात. विधान सभा आणि विधान परिषदेतील नियम वेगळे असले तरी दोन्ही सभागृहाचे कामकाज सारखेपणाने सुरू असते. सद्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून कामकाज चालवले जात आहे. अधिवेशन काळात समाजाचे लक्ष कसे कामकाजावर असते. याबाबतचा आपला अनुभव उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितला.

शतक महोत्सवानिमित्त विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्व आणि वैशिष्ट्य, गत शंभर वर्षातील महत्वपूर्ण विधेयके, ठराव, विधान परिषदेमध्ये लोकहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवर, विषयांवर झालेल्या चर्चा,शंभर वर्षे शंभर भाषणे आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक अशी पाच प्रकाशने प्रस्तावित असून यासंदर्भातील संपादन कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे, अशी माहिती उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

लोकशाहीमधील उणिवा भरून काढणे आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी लोकशाहीतील या सार्वभौम सभागृहाचे आतापर्यतचे कामकाज प्रेरणादायी राहिले आहे. माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम, १९१९ अन्वये “बॉम्बे लेजिस्नेटिव्ह कौन्सिल” ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना आहे. देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात व्दिसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, विधान परिषदेतील कामकाजाचा अनुभव माझ्या सारख्या कार्यकर्त्याला खूप काही शिकवून गेला. मला सदस्य आणि मंत्री म्हणून काम करण्याची संधी सुद्धा विधान परिषदेच्या माध्यमातून मिळाली असे सांगून आपला राजकीय प्रवास आणि विधिमंडळ कामकाजा अनुभव यावेळी सांगितला.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या सभागृहात अनेक ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, समाजसेवक, कलावंत इ. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सभासद म्हणून सहभाग असतो. खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांचे जतन करणे व लोकशाही बळकट करणे ही दोन्ही उद्दिष्टे या सभागृहामुळे साध्य होतात. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते, नवीन कायदे होतात आणि समाजाला न्याय मिळतो. सभागृहात सदस्यांना आपले विचार मांडायला संधी मिळते. या शताब्दी वर्षप्रित्यर्थ आयोजित परिसंवादाचे विषय आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचे असून त्यातून आपल्या सर्वांच्या मनातील जुन्या आठवणी व प्रसंग तसेच दिवंगत सदस्यांच्या आठवणी उभ्या राहतील. त्याबरोबरच या सभागृहाचे असलेले महत्व देखील अधोरेखीत होईल याची मला खात्री आहे.

विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार म्हणाले की, विधानपरिषद ही व्यवस्था लोकशाहीला बळकट करणारी महत्वाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था अबाधीत राहणे आवश्यक आहे. पुरोगामी विचार रुजविण्याचे काम सभागृहाने केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून जास्तीत जास्त सदस्य विधानपरिषदेवर आले पाहिजेत, त्यांच्यासाठी असलेली सदस्यांची संख्या वाढवली पाहिजे. प्रतिवर्षी आजी, माजी सदस्यांचा मेळावा घेण्यात यावा अशा सूचनाही विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार यांनी केल्या.

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, अजय वैद्य, विजय वैद्य, राही भिडे,योगेश त्रिवेदी,विलास मुकादम, शीतल करदेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विधान परिषद सभागृहाची आवश्यकता व महत्व आणि आमच्या आठवणीतील विधानपरिषद या दोन परिसंवादात सविस्तर चर्चा करण्यात आली.