Thursday, December 5 2024 6:16 am

विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम

मुंबई, 13 : पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व विचारात घेता नागरिकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीत कृषी विभागातील अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना तृणधान्य पिके, त्यांची पौष्टिकता, त्यांचे आहारातील समावेशाचे फायदे याबाबत माहिती दिली जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीमध्ये याबाबत जनजागृती केली जाईल. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या पोषण पंधरवड्यात शाळा आणि तालुकास्तरावर पालक, नागरिक आणि योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. यातील सर्वोत्कृष्ट तीन पाककृतींसाठी अनुक्रमे पाच हजार, तीन हजार 500 आणि दोन हजार 500 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत ‘तृणधान्य आणि त्यांचे दैनंदिन आहारातील महत्त्व’ याविषयी विद्यार्थ्यांसाठी निबंध तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

केंद्र सरकारने ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोदो, कुटकी, सावा, राजगिरा आदी पिकांचे वर्गीकरण हे पौष्टिक तृणधान्य म्हणून केले आहे. भारत हा जगातील तृणधान्य पिकवणारा प्रमुख देश आहे. तथापि, सध्या आपल्या राज्यात व देशात तृणधान्यांचे क्षेत्र कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून तृणधान्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच दैनंदिन आहारात त्यांचा समावेश होण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्य व त्याची पौष्टिकता याचे महत्त्व कळावे या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव इम्तियाझ काझी यांनी परिपत्रक जारी केले आहे.