Tuesday, April 23 2019 9:36 pm

विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला २० कोटी रुपयांचा निधी.

निरंजन डावखरेंचा पुढाकार : आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आश्वासन ! 

ठाणे- : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात आणखी इमारत उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज येथे केली. उपकेंद्राला निधी देण्याबरोबरच आणखी सुविधाही पुरविण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला महासभेची मान्यता घेण्यात येणार असल्याचे आयुक्त जयस्वाल यांनी नमूद केले.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या पुढाकारानुसार, मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील अडचणी सोडविण्याबाबत महापालिकेत आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार डावखरे, कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे, माजी प्र-कुलगुरु डॉ. नरेशचंद्र, डॉ. अजय भामरे, उपकेंद्राचे प्रभारी चंद्रशेखर मराठे आदी उपस्थित होते.
ठाणे उपकेंद्रात बीबीए एलएलबी व बीएमएस एमबीए अभ्यासक्रम सुरु असून, ३५० हून अधीक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, बीबीए एलएलबी अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत होती. या मुद्द्यासंदर्भात आमदार डावखरे यांनी उपकेंद्राला १९ ऑक्टोबर रोजी भेट घेतली होती. त्यावेळी उपकेंद्रातील गैरसोयीही उघड झाल्या होत्या. त्यांनी याबाबत प्रभारी संचालक डॉ. चंद्रशेखर मराठे यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाकडे काही प्रश्न प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले होते. उपकेंद्राकडे जाणारा रस्ता, टीएमटी बससेवेची अपुरी संख्या, विद्यापीठाकडे जाण्यासाठी दिशानिर्देश करणारे फलक आदींबाबत चर्चा झाली होती. या प्रश्नांसंदर्भात आमदार डावखरे यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महापालिकेत आज बैठक घेण्यात आली.
           उपकेंद्रात आणखी एक इमारत उभारण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. उपकेंद्राच्या इमारतीची ओसी, टीएमटी बससेवेच्या वाढीव फेऱ्या, उपकेंद्राकडे जाण्यासाठी पक्का रस्ता, दिशादर्शक फलक आदींचे काम सुरू केले जाईल. या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मान्यता घेतली जाईल, असे आश्वासन आयुक्त जयस्वाल यांनी दिले.
              ठाणे येथील उपकेंद्रात शिक्षकांच्या अपु्ऱ्या संख्येमुळे अडचणी येत असल्याकडे आमदार डावखरे यांनी कुलगुरु पेडणेकर यांचे लक्ष वेधले. तसेच जादा शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी डावखरे यांनी केली. त्यावेळी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरु पेडणेकर यांनी दिले.