मुंबई, ०४ : मुंबईतील विक्रोळी भागात एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे.
या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण या इमारतीत अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. या घटनेने इमारत परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून लिफ्टमध्ये अडकलेल्यांसाठी बचाव कार्य सुरू आहे.
श्री सिद्धीविनायक सोसायटी असं या इमारतीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी येथे श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह या सोसायटीची २३ माळ्यांची इमारत आहे. या सोसायटीच्या पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच पार्किंग लिफ्टचा ढाचा २३ व्या मजल्यावरून खाली कोसळला. यावेळी चार कामगार लिफ्टचे काम करत होते. यातील एका कामगाराचा मृत्यू झाला. दोघांना बाहेर काढण्यात आले. एक कामगार लिफ्टमध्येच अडकल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरू केले आहे.
या सोसायटीचे बांधकाम हे अनधिकृत करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परवानगी नसताना इमारतीच्या लिफ्टचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. याबाबतचे स्ट्रक्चर देखील मागण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आम्हाला याविषयी कोणतीच माहिती देण्यात आली नाही. याबाब तक्रारी देखील केल्या आहेत, अशी माहिती स्थानिकांनी या कामाविषयी दिली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन याबाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे.