मराठवाड्यावरील दुष्काळाचा शिक्का कायमचा पुसणार
नांदेडमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
नांदेड, 10 महायुतीने मराठवाड्यासाठी ४७ हजार कोटींच्या योजना सुरु केल्या. मराठवाड्यावरचा दुष्काळ कायमचा हटवायचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने बंद केलेला मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प सुरु केला आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे दुष्काळमुक्त मराठवाडा झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित जाहीर सभेत ते बोलत होते. विकासाला गती प्रगतीला वेग महायुतीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राज्यामध्ये विकासाची गंगा आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मराठवाड्यात विकासाची प्रंचड क्षमता असून सरकार मराठवाड्याला दुष्काळमुक्त करेल, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, देशात ६० वर्षात विकास झाला नाही तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात करुन दाखवला. राज्यात डबल इंजिनचे सरकार काम करत आहे म्हणून महाराष्ट्र पुढे जातोय. सरकारने विकासकामे केली आणि कल्याणकारी योजना राबवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवली आणि सुपरहिट झाली. राज्यातील अडीच कोटी बहिण परिवार आहे. कॉमन मॅनला सुपरमॅन करायचा आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की संकल्प आणि सिद्धीचे दुसरे नाव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे. विचार आणि विकासाचे एक सूत्र म्हणजे नरेंद्र मोदीजी आणि गति आणि प्रगतीचा संगम म्हणजे नरेंद्र मोदीजी असे कौतुकौद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सहाकार्य केले, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या फेक नरेटिव्हला सडेतोड उत्तर देऊन सत्याचा विजय साकारला होता. तशीच सत्य आणि असत्याची लढाई आता महाराष्ट्रात सुरु आहे, असे ते म्हणाले. राज्यात खोटारड्या, थापाड्या आणि लबाड लोकांचा कळप तयार झाला आहे, त्यांना चारीमुंड्या चीत करुन लोकशाहीचे युद्ध जिंकायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. खोट्यांच्या माथी गोटा हाणायला लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आणि लाडके तरुण सक्षम आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. बहुमताने पुन्हा महायुती सत्तेत येईल आणि विरोधकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दिल्लीतील फुसके फटाके महाराष्ट्रात येऊन संविधान बदलणार अशी बोंब मारतात. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलणार नाही. विरोधकांची झूठ की दुकान आता बंद करण्याची वेळ झाली आहे. हातात संविधान दाखवले म्हणजे सन्मान होत नाही, सर्वसामान्यांचा सन्मान हा संविधानाचा सन्मान आहे. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात करुन दाखवला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महायुतीच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेतून संविधानाचा सन्मान होत आहे. महाविकास आघाडीची पंचसुत्री नाही तर थापासुत्री आहे, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेर म्हटला.
मोदी नाम के शेर ने विरोधीयोंका कद दिया ढेर
लोकसभा में आपने यह देखा है, विरोधी लोग झुंड में आये लेकीन मोदी साहब की गलती ढुंढ न पाये
काँग्रेसने पिछले ६० साल मे कर दी देश की बरबादी
और अब विकास का एकही नाम है नरेंद्र मोदी
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विकासाची गंगा सुरु केली त्यात सहभागी व्हायचे सोडून उबाठा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. निघाले होते जपानला आणि पोहोचले चीनला अशी उबाठाची अवस्था आहे, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी पाकिस्तानची बोली बोलत आहे. काँग्रेसला राज्यातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.