मुंबई, 4 : हिंद मिल कम्पाऊंड यांची मालकी असणारी मालमत्ता मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाला (म्हाडा) सन 1961 मध्ये हस्तांतरीत करण्यात आली होती. ही जागा लोकमान्य नगर, प्रियदर्शिनी सहकारी गृहनिर्माण संस्थेला सन 1988 पासून 90 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली आहे. हा भूखंड विकासकाकडे देण्यात आला होता. यासंदर्भात देण्यात आलेल्या चटई क्षेत्र निर्देशांक, करारनाम्याचे उल्लंघन आणि अटी व शर्तींचा भंग झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य कैलास गोरंट्याल यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सावे यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, या संस्थेच्या 10 चाळी अस्तित्वात होत्या व त्यामध्ये एकूण 264 (संस्थेच्या कार्यालयासह) भाडेकरु / रहिवाशी व 08 सफाई कामगार आहेत. मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ यांनी या संस्थेस ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास संमती दिली होती. त्यानुसार लोकमान्य नगर, प्रियदर्शिनी संस्थेने विकासकाची नेमणूक केली. म्हाडाने यासंदर्भातील करारातील अटी विकासकाने पूर्ण केल्याचे दिसत असले, तरी यासंदर्भात तक्रारी असतील, तर त्याची चौकशी करण्यात येईल, असे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.