Saturday, January 18 2025 5:44 am
latest

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेत केंद्रशासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचतील या दृष्टीने नियोजन करावे – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

ठाणे 24 :- शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही’ विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिम 26 जानेवारी 2024 पर्यत सुरु राहणार आहे. या मोहिमेतील सर्व योजना या तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचाव्यात यासाठी ठाणे महापालिकेने महापालिका क्षेत्रातील तळागाळातील लोकांसाठी जनजागृती करणे, सोशल मिडीया उदा. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमातून या योजनांची माहिती पोहचविणे व यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन घ्यावे असे केंद्र शासनास अभिप्रेत आहे.

आज (दिनांक 23/11/2023) ठाणे महानगरपालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, भारतसरकार, विदेश मंत्रालय (माजी खासदार- राज्यसभा) डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, वर्षा दिक्षीत, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, उपनगरअभियंता विकास ढोले, घनकचरा विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, यांच्यासह ठाणे महापालिकेच्या विविध विभागाचे संबंधित अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या योजनांची माहिती करुन घेण्यासाठी आज ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम देशभरात राबविली जाणार आहे. प्रत्येक गरजू भारतीय लाभार्थ्याचा शोध घेवून सर्व लाभार्थ्यापर्यंत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचविणे गरजेचे आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकाचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनांमध्ये ठाणे महानगरपालिका अंतर्गतच्या ‘पीएम स्वनिधी योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, पीएम ई- बस आणि अमृत योजना’ आदी सुरू असलेल्या योजनांची सद्यस्थिती व माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहिम राबवित असताना ‘विकसित भारत, विकसित ठाणे आणि विकसित वस्त्या’ अशा पध्दतीची जनजागृती केल्यास मा. पंतप्रधान महोदय यांच्या संकल्पनेनुसार जी विकसित भारत यात्रा मोहिम सुरू केली आहे, ती खऱ्या अर्थाने साकार होईल. तसेच या योजनांची माहिती नागरिकांपर्यत पोहचवित असताना ज्या विभागात ज्या दिवशी संकल्प यात्रा जाणार असेल त्याची पूर्वकल्पना त्या विभागातील नागरिक, लोकप्रतिनिंधी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना दिल्यास मोठ्या प्रमाणावर या योजना तळागाळातील नागरिकांपर्यत पोहचतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यापूर्वी या योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांनी घेतला आहे, त्याबद्दलचे त्यांचे अनुभव किंवा जे अधिकारी या योजनांची अंमलबजावणी करीत आहेत, त्यांना आलेले अनुभव देखील नागरिकांपर्यत पोहचावेत, जेणेकरुन नागरिक मोठ्या प्रमाणावर या योजनांचा लाभ घेतील असेही त्यांनी नमूद केले.

सद्यस्थितीत सोशल मिडीया हे नागरिकांपर्यत पोहचण्याचे प्रभावी माध्यम असल्याने विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती व सहभाग घेण्याचे आवाहन जर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केले तर याचा फायदा नागरिकांना नक्की होण्यास मदत होणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही ठाणेकरांचे योगदान हे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या माध्यमातूनही जनजागृती करण्यात यावी असेही डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केले.

मा. पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून देशातील सर्व शूरवीर यांचेकरिता राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या मध्ये ठाणे महापालिकेने भरीव योगदान केलेले असल्याने शासनाने ठाणे महापालिकेने केलेल्या प्रयत्नांची दखल घेवून प्रशंसा केली आहे, याबद्दल मी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त करतो असेही डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केले. तसेच संकल्प भारत विकसित यात्रा याबाबत देखील आयुक्तांनी योग्य नियोजन करुन पूर्वतयारी केली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.