Tuesday, July 23 2019 2:17 am

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिकेचा सक्रिय प्रतिसाद हवा : आमदार संजय केळकर.

ठाणे : ठाण्यातील वाहतुकीच्या विविध समस्यांबाबत, वाहतूक कोंडी बाबत ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्या कार्यालयात वाहतूक शाखा, आर. टी. ओ. व नागरिकांचे प्रतिनिधी अशी संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोही, नगरसेवक सुनेश जोशी, कोपरी संघर्ष समितीचे सदस्य राजेश गाडे, नितीन पाटील, गोखले रोड, स्टेशन रोड येथील व्यापारयांचे प्रतिनिधी मितेश शाह, भाजपा नौपाडा मंडल उपाध्यक्ष दिलीप सत्रा, विनय नाईक व नागरिक देखील उपस्थित होते. या बैठकीत भाजप  केळकर यांनी उपस्थित राहून वाहतुकीच्या विविध समस्यांबाबत व ठोस उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार संजय केळकर यांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पालिकेचा सक्रिय प्रतिसाद आवश्यक असल्याची प्रतिक्रिया मांडली.
           ठाणे पूर्व कोपरी भागातील होणारी अवैद्य वाहतुक कोपरी संघर्ष समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा निदर्शणास आणून दिल्यावर तातडीने या अवैद्य वाहतुकीवर कारवाई करावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी केली.   वाहतूक पोलीस व आर. टी. ओ. पोलीस अशी संयुक्त कारवाई  करणार असल्याचे अमित काळे व लोही यांनी बैठकीत सांगितले. तसेच कोपरी या ठिकाणी प्रवेशावर पोलिसांसाठी बूथ ठेवण्यात येणार असून सी. सी. टीव्ही कॅमेरे ही लावण्यात येणार आहे असे आ. केळकर यांनी सांगितले.
          गोखले रोड, राम मारुती रोड प्रमाणे डॉ. मूस रोड वर गडकरी रंगायतन ते जैनांचार्य अजरामरजी चौक पर्यंत काल मर्यादित पार्किंग पद्धत राबवणार असून महर्षी कर्वे रोड, आगास्कर मार्गा येथे आधी काढलेल्या नोटिफिकेशन ची अंमलबजावणी करणार येणार आहे. मॉडेला येथील ट्रक टर्मिनस मंजूर असल्याचे व त्यावर कार्यवाही करणेबाबत दोन वर्षांपूर्वी महापालीकेने मला पत्र देऊन सुद्धा दिरंगाई होत असल्याचे तसेच विविध आरक्षित भूखंडावर वाहनतळ उभारणेबाबत ठोस पावलं पालिकेकडून उचलली जात नसल्याबाबत आमदार संजय केळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मार्टसिटी उभारत असताना वाहतुकीच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे असेही आ. केळकर यांनी बोलताना सांगितले. स्टेशन परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीवर पहाणी करून लवकरच वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सकारात्मक बदल करणार असून अनधीकृत रिक्षा स्टँडवर कारवाई करण्यात येणार आहे. सुभाष पथ परिसरात नो पार्किंग चे बोर्ड बसवणार असून वाहतूक नियमांचे बोर्ड व्यापारी संघटने तर्फे देण्यात येणार आहेत तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वॉर्डन नेमणार असल्याची माहिती आ. केळकर यांनी बोलताना दिली.