Monday, March 17 2025 11:36 pm

वाढते नागरिकरण आणि विजेची मागणी लक्षात घेऊन भोसरी उपविभागाचे विभाजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 03 –पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी आहे. वाढते शहरीकरण आणि त्यांना आवश्यक सोयीसुविधा देणे ही राज्य शासन म्हणून जबाबदारी आहे. या सर्व भागातील वाढते नागरिकरण, लोकवस्ती व भविष्यात वाढणारी विजेची मागणी विचारात घेऊन या ठिकाणी भोसरी उपविभागाचे भोसरी उपविभाग क्रमांक. 1 आणि उपविभाग क्रमांक. 2 असे विभाजन करण्यात येईल. लोकसंख्या वाढल्यामुळे ग्राहक संख्येच्या मानकांच्या विहीत निकषांची पडताळणी करून चिखली शाखा कार्यालय निर्माण करुन त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सदस्य महेश लांडगे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात मेट्रोची कामे सुरु असल्यामुळे तेथील वीजवितरणाच्या केबल तुटल्याने काही भागात वीज खंडित होण्याच्या घटना घडल्या होत्या. यापुढील काळात मेट्रो प्रशासन आणि महानगरपालिका यामध्ये समन्वय राहील, याची काळजी घेतली जाईल. या भागातील नागरिकरण वाढल्याने वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सफारी पार्क – मोशी (100एम.व्ही.ए.) आणि चऱ्होली (प्राइड वर्ल्ड सिटी) (200 एम. व्ही.ए.) येथे नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र प्रस्तावित केलेले असून तांत्रिक सुसाध्यता पडताळणी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, 220/22 केव्ही सेंचुरी एन्का, भोसरी येथील महापारेषण उपकेंद्रामध्ये अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर 100 एमव्हीए प्रस्तावित केलेले आहे. या प्रस्तावाची तांत्रिक व अर्थिक व्यवहार्यता तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल. या व्यतिरिक्त भोसरी परिसरात, महानगर प्रदेश प्रणाली मजबुतीकरण योजना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उच्चदाब उपरी वाहिनी, उच्चदाब भूमीगत वाहिनी, नवीन रोहित्रे, लघुदाब भूमिगत वाहिनी, लघुदाब उपरी वाहिनी भूमीगत करणे, रिंगमेन युनिट बदलणे आदी कामे करण्यात आली असून काही कामे प्रगतिपथावर आहेत. याशिवाय सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) योजनेअंतर्गत रू. 226.45 कोटी इतक्या रकमेची एरियल बंच केबल, कॅपॅसिटर बँक, मल्टीमीटर बॉक्सेस, अपग्रेडेशन आफ लाईन, फिडर बे, नवीन उच्चदाब भूमीगत वाहिनी, नवीन लघुदाब भूमीगत वाहिनी, नवीन रोहित्रे, रोहित्र क्षमता वाढ, एफपीआय, ओव्हरहेड वीज वाहिन्याचे भूमीगत वाहिन्यांमध्ये रुपांतर करणे इत्यादी पायाभूत सुविधांची कामे प्रस्तावित आहेत. तळवडे येथील देवी इंद्रायणी स्वीचिंग उपकेंद्रातून स्वतंत्र फिडर व इतर कामे अंतर्भूत आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम होऊन सर्व संवर्गातील ग्राहकांना गुणवत्तापूर्वक अखंडित वीज पुरवठा करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात आणि संजय जगताप यांनीही चर्चेत भाग घेतला.