*महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम*
ठाणे,14 – स्पर्धा परिक्षांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यास ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने सुरूवात केली आहे. त्या अभियानातील पहिले शिबीर नुकतेच पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यामधील डॉ. शांतीलाल धनजी देवसे आर्टस, कॉमर्स ॲण्ड् सायन्स कॉलेज (स्वामी कॉलेज) आणि वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड् सायन्स येथे झाले.
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशान्वये, अतिरिक्त आयुक्त (1) संदिप माळवी, उपआयुक्त अनघा कदम व संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराची आखणी करण्यात आली होती. या मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही महाविद्यालयातील सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला.
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत, तसेच, कोणत्याही क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करायचे असेल, तर ध्येयनिश्चितीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, अभ्यासाचे योग्य नियोजन करणे, अभ्यासामुळे आलेल्या ताण-तणावाचे व्यवस्थापन करणे, अभ्यास करताना दैनंदिन घडामोडींचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. तसेच, स्पर्धा परीक्षा देताना त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे, कोणती पुस्तके व मासिके वाचावीत, स्पर्धा परीक्षेकरीता अभ्यासाची सुरुवात कशी करावी, किती वेळा परीक्षा देऊ शकतो, वयाची अट काय?, स्पर्धा परीक्षेचे एकूण टप्पे किती आहेत, सदरचे टप्पे कसे पार करावे, कोणता वैकल्पिक विषय घ्यावा व त्याचा अभ्यास कसा करावा? याबाबतचे मार्गदर्शन चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी विद्यार्थ्यांना केले.
तर, संस्थेचे समन्वयक गिरीश झेंडे यांनी स्पर्धा परीक्षेकरीता व्यक्तिमत्व विकास किती महत्त्वाचा आहे, त्याअुनषंगाने वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, संभाषण कौशल्य, लेखन कौशल्य, स्वत:मधील गुणवत्ता व सुप्तगुण, आपल्यामधील सामर्थ्यस्थळे कशी ओळखावीत, स्वप्न आणि ध्येय यामधील फरक, आपले ध्येय कशा प्रकारे पूर्ण करावे, याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या शिबिराला डॉ. शांतीलाल धनजी देवसे आर्टस, कॉमर्स ॲण्ड् सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. खांडेकर आणि वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड् सायन्स कॉलेजचे संचालक योगेश गंधे उपस्थित होते.