Wednesday, April 23 2025 1:55 am

वागळे, उथळसर, कळवा विभागातून 451 किलो प्लास्टिक जप्त

ठाणे, 23 : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रात नियमित प्लॅस्टिक बंदी कारवाई सुरू असून आज घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत वागळेइस्टेट, उथळसर, कळवा व दिवा प्रभागसमिती कार्यक्षेत्रात कारवाई करण्यात आली. या तिन्ही विभागाअतंर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 451 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून यापोटी एकूण 11500 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

वागळे प्रभाग समिती अंतर्गत प्लास्टिक बंदी अभियान राबविण्यात आले. या विभागात एकूण 23 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून एकूण 3 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून त्यांचकडून 5,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत गोकुळ दास वाडी खोपट येथील एका प्लास्टिक गोडावून मध्ये 450 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 5000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात एकूण 8 आस्थापनांना भेटी देऊन 01 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून त्यापोटी एकूण दंड ₹.1500/- वसूल करण्यात आला. सदरची कारवाई उपायुक्त तुषार पवार यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक जयंत पटनाईक, रायमन दांडेकर, उपमुख्य स्वच्छता यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.