ठाणे, ४ : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्ताने समन्वय प्रतिष्ठान व भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने येत्या शनिवारपासून (ता. ७) दोन दिवस डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात राज्यस्तरीय भजनस्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे.
दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृतीदिनी दरवर्षी भजनस्पर्धा आयोजित केली जाते. यंदा सलग पाचव्या वर्षी शनिवारी व रविवारी भजनस्पर्धा रंगणार आहे. त्यात ठाणे जिल्ह्याबरोबरच अंधेरी, खोपोली, सावंतवाडी, वाडा, मोखाडा, कर्जत, बदलापूर येथील दर्जेदार भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना या विकेण्डला भजनांची मेजवानी मिळेल. समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे कोकण संयोजक विकास घांग्रेकर यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेतील पुरुष व महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे ११, ७, ५ आणि तीन हजार रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र दिले जाईल. त्याचबरोबर उत्कृष्ट पखवाज, झांज, तबला, पेटीवादकांचाही पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.