Friday, December 13 2024 10:37 am

वर्धापन दिनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील १५० जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील लुईसवाडी, अंबिकानगर भागातील सुमारे १५० तरूणानी शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेला अभिप्रेत राहून गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री ना.डॉ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी या युवकांचे पक्षात स्वागत केले.

लुईसवाडी, अंबिका नगर आदी भागात दर्शन महाडिक, ओंकार महाडिक, राकेश चव्हाण, राहुल जगताप, सुमीत जगताप, आकाश भगत, पारस तुपे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दीडशे तरूण सामाजिक कार्यात आघाडीवर आहेत. या सामाजिक कार्याला दिशा देण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याने या सर्वांनी आज वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रवेश केला.
यावेळी आनंद परांजपे यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले की,तरूणांना योग्य दिशा देण्याचे काम शरदचंद्र पवारसाहेब आणि ना.डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

त्यामुळेच या तरूणांना राष्ट्रवादी पक्ष आश्वासक वाटत आहे. तरूणांच्या क्षमतेला योग्य मार्ग दाखविण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. हाच विश्वास कायम ठेऊन तरूण पक्षात आले आहेत.
दरम्यान, हे तरूण युवक आघाडीत काम करणार असून लवकरच त्यांची योग्य पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे, असे विक्रम खामकर यांनी सांगितले.
यावेळी सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, विधानसभाध्यक्ष विजय भामरे, अजित सावंत, समीर पेंढारे, रत्नेश दुबे, आदी उपस्थित होते.