Thursday, November 14 2024 4:12 am

वरळीच्या बीडीडी चाळ दुकानदार संघाचा न्यायालयावर विश्वास

मुंबई,१८ : वरळीच्या बीडीडी चाळ दुकानदार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत दुकानदारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. संघाचे अध्यक्ष श्री. दिलीप शिंदे म्हणाले की, आम्ही गेली अनेक वर्षे शासनाकडे दुकानदार सभासदांची बाजू मांडत आलो आहोत. परंतु झोपडपट्टीधारकांना न मागता २६९ ऐवजी ३०० चौ. फूट जागा देण्याचा निर्णय शासन घेत असताना दुकानदारांच्या बाबतीत मात्र आर्थिक प्रश्न उपस्थित केला जात आहे, याची दखल न्यायालय घेईल, अशी आम्हाला खात्री आहे असे म्हणत न्यायालयांवर संपूर्ण विश्वास व्यक्त केला.

संघाचे उपाध्यक्ष डॉ. विकास दुबेवार म्हणाले की, आपण आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता सर्व सभासदांनी एकजुटीने कार्य करणे आवश्यक आहे. सभासदांची मागणी रास्त असून न्यायालयात आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध न्याय नक्की मिळेल, असे ते म्हणाले. यासंदर्भात संघाचे कायदेविषयक सल्लागार श्री. निहीलभाई यांनी कोर्टात सादर केलेल्या याचिकेची सविस्तर माहिती डॉ. दुबेवार यांनी दिली.

सभासद दुकानदारांचे हित शासनाला दुर्लक्षित करता येणार नाही. न्यायदेवतेवर आमचा सर्वांचा अढळ विश्वास आहे, अशी भावना संघाचे सचिव श्री. विशाल भोसले यांनी व्यक्त केली.