Friday, May 24 2019 7:33 am

वडपे ते ठाणे आठ पदरीकरण, शहापूर ते खोपोली चारपदरीकरण कामांचा शुभारंभ ठाणे जिल्ह्यातील जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच

 ठाणे -: मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी आगामी काळात जलवाहतुकीवर भर देण्यात येणार असून पुढील आठवड्यात यासंदर्भात यासंदर्भातील एक विस्तृत जल वाहतूक आराखड्यास मंजुरीची प्रक्रिया पार पडणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

 मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील वडपे ते ठाणे या सुमारे २३ किमी अंतराचे आठ पदरीकरण, त्याचप्रमाणे शहापूर ते खोपोली या ९१ किमी रस्त्याचे चार पदरीकरण कामाचे ई भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले ,त्यावेळी ते बोलत होते.

नितीन गडकरी यांनी देखील बुलेट ट्रेनच्या तोडीस तोड असा १ लाख कोटी रुपये खर्चाचा आणि १२ तासांत मुंबई ते दिल्ली अंतर कापणाऱ्या भव्य द्रुतगती महामार्गाचे काम लवकरच सुरु होत आहे असे सांगितले. ठाणे जिल्ह्यातील ८ जेट्टींच्या कामांसाठी १०० कोटीस मंजुरी दिल्याची घोषणाही त्यांनी केली. हा पायाभरणी सोहळा भिवंडीनजीक दिवे अंजूर गाव येथे पार पडला.

ठाणे-वडपे महामार्गासाठी ११८२.८७ कोटी, तर शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली राष्ट्रीय महामार्गाच्या ९१ किमी रस्त्यासाठी ४४५.७ कोटींचा खर्च येणार आहे. या कामासाठी सुमारे ३ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी हायब्रीड एन्युटी मॉडेलने विकसित केले जाईल. अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम आणि बीओटी तत्वावर आधारित हे मॉडेल असेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले की, जलवाहतुकीमुळे मुंबईच्या वाहतुकीचे चित्र निश्चितपणे बदलू शकेल हे ओळखून आम्ही रोरो तसेच रो पैक्स सेवा कशा सुरु करता येतील ते पाहणार आहोत, पुढच्या आठवड्यात या अनुषंगाने आम्ही महत्वाचे निर्णय घेणार आहोत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प आम्ही वेळेत पूर्ण करूत अशी ग्वाही दिली.

रस्त्याच्या विकासात देशातील अग्रगण्य राज्य

२०१४ पर्यंत महाराष्ट्रात केवळ ५ हजार किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. २०१४ ते २०१९ या कालावधीत केवळ नव्याने मान्यता दिलेल्या महामार्गांची लांबी २० हजार किमी असून नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाने ७ हजार किमी लांबीचे महामार्ग पूर्ण झाले आहेत. समृद्धी द्रुतगती महामार्ग तसेच त्याला येऊन मिळणारे हे नवे राष्ट्रीय महामार्ग यामुळे किमान २४ जिल्ह्यांचा झपाट्याने विकास होईल तसेच महाराष्ट्र हे रस्त्याच्या विकासात देशातील अग्रगण्य राज्य बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कल्याण-बदलापूर मेट्रो

  जिल्ह्यात भिवंडी-कल्याण भागापर्यंत मेट्रोची आखणी झाली आहे. पुढे ती बदलापूरपर्यंत जाण्यासाठी मी आजच या मार्गाचा विकास आराखडा तयार करण्याचं सुचना देत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, टिटवाळा ते मुरबाड अशा मोठ्या रस्त्याच्या कनेक्टीव्हिटीसाठी सुद्धा राज्य सरकार आपला ५० टक्के वाट उचलेल. माणकोली तसेच रांजनोली पुलाच्या कामास झालेला विलंब लक्षात घेता तेथील कंत्राट दुसऱ्या कंत्राटदारास दिले असून या ऑगस्टपर्यत हे काम पूर्ण करण्याच्या सुचना त्यांना दिल्या आहेत. दुर्गाडी , मोठागाव पुलाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचेही ते म्हणाले.

ठाणे-वसई जलवाहतूक पहिला टप्पा शुभारंभ लवकरच

याप्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात आजमितीस ५ लाख कोटींची रस्ते वाहतूक-दळणवळण विषयक कामे सुरु असल्याचे सांगून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केलेल्या ठाणे-वसई या पहिल्या टप्प्यास १२०० कोटींची मंजुरी दिली आहे तसेच ५२५ कोटी निधी उपलब्ध केला आहे. ठाणे पालिकेने जलवाहतुकीचा उत्तम विकास आराखडा तयार केला असून लवकरच या वाहतुकीचे भूमिपूजन व्हावे असशी अपेक्षा व्यक्त केली.

मुंबई-दिल्ली ऐतिहासिक महामार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे काम मी मंत्री असतांना झाले होते आता आम्ही मुंबई- ते दिल्ली अशा ऐतिहासिक द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले असून यासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येईल. हा १२ पदरी महामार्ग असणार आहे. गुडगाव-जयपूर-सवाई माधोपुर—अलवार-रतलाम-वडोदरा- आणि मुंबई असा हा मार्ग असून भिवंडीतून देखील जाणार आहे त्यामुळे निश्चितच याचा फायदा या भागातील नागरिकांना होईल. वडोदरा ते मुंबई या टप्प्यासाठी ४४ हजार कोटींच्या निविदेसही मंजुरी मिळाली असून खऱ्या अर्थाने देशाचे ग्रोथ इंजिन राहणार आहे अशी माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.

मुंबई आणि परिसरातील बेतान्मधून मोठ्या प्रम्नानावर जल वाहतूक सुरु झाली पाहिजे, विमानतळावर फाच्ण्यासाठी देखील वॉटर वे (जलमार्ग) विकसित केले पाहिजेत असे सांगून ते म्हणाले की, नुकतीच आम्ही औरंगाबादेत एअरबसची चाचणी घेतली असून ठाणे –भिवंडी अशा मार्गावर ही डबल डेकर एअर बस चालविण्याबाबत नियोजन करावे लागेल. माळशेज घाटाचे कामही लवकरच सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.

जलवाहतुकीबाबत राज्याने धोरण ठरवावे

यमुनेतून आग्रा ते दिल्ली अशा जलमार्गाने एअर बोट चालविण्याची चाचणी आम्ही घेतली असून सुमारे ८० किमी प्रति तास या वेगाने जाणाऱ्या या बोटींचा उपयोगही मुंबईसाठी करता येईल.

जलवाहतुकीबाबत राज्याने स्वतंत्र धोरण ठरवावे त्यात जेएनपीटी देखील आपले योगदान देईल असेही गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.

जट्रोफाचे उत्पादन वाढवा

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात जट्रोफाचे उत्पादन वाढविल्यास एकीकडे आदिवासी व शेतकऱ्यांना सुद्धा उत्पन्न मिळेल तर दुसरीकडे पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा जास्तात जास्त वापर करता येईल असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

रस्ते विकास महामंडळास बळ

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास बळ देण्याचे काम केल्याबद्धल सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की वडपे-ठाणे महामार्गाचे आठ पदरीकरण झाल्याने वाहतुकीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल असे सांगून त्यांनी तळोजापर्यंत जाणारी मेट्रो शिळमार्गे नेण्याची तसेच ठाणे बायपासला गती देण्याची गरज आहे असे सांगितले.

भिवंडीत २४ हजार कोटींची कामे

भिवंडी परिसरात गेल्या पावणेपाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर विविध विकासाची कामे सुरु आहेत असे सांगून खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नितीन गडकरी यांनी भगीरथाप्रमाणे या भागात विकासाची गंगा आणली असे उद्घर काढले. ते म्हणाले की, २४ हजार कोटींची कामे येथे सुरु असून इतक्या मोठ्या प्रमाणावर विशिष्ट काळात कामे सुरु असलेला हा एकमेव  मतदारसंघ असेल. विविध प्रकल्पांमुळे भिवंडी भागातील शेतकऱ्यांना जागा द्यावी लागते त्यांनाही योग्य तो न्याय मिळावा अशी एक्शाहि त्यांनी व्यक्त केली. कसाऱ्यापर्यंत जाणार्या मुंबई-नाशिक रस्त्याचे अंडरपासेसचे काम लवकर व्हावे जेणे करून आजूबाजूच्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळेल अशी मागणीही त्यांनी केली.

प्रारंभी एमईपीतर्फे अध्यक्ष जयंत म्हैसकर यांनी या प्रकल्पाचा आराखडा माण्य्वाराना दाखविला. यावेळी स्मृतीचिन्हे देखील देण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य सर व्यवस्थापक अतुलकुमार यांनी प्रास्ताविक केले. खासदार कपिल पाटील यांच्या कार्य अहवालाचे देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमास खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार महेश चौगुले, नरेंद्र पवार ,संजय केळकर, किसन कथोरे, निरंजन डावखरे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राधेश्याम मोपलवार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार आदींची उपस्थिती होती.