ठाणे, २४ – एकीकडे कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे अशी माहिती समोर येत असताना तालुकास्तरीय १३८ कुपोषित बालकांची तपासणी शिबिर भिवंडी तालुक्यातील पडघा आरोग्य केंद्रात घेण्यात आले. आरोग्य विभाग, पंचायत समिती-भिवंडी व जगन्नाथ म्हाप्रळकर विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ञामार्फत आरोग्य तपासणी शिबिर दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३ या वेळेत संपन्न झाला.
तालुका पातळीवर उत्तमरित्या बालकांची काळजी घ्यावी या उद्देशाने बालकांची तपासणी करण्यात आली तसेच बालकांनी संतुलित आहार कोणते द्यावे या संदर्भात जनजागृतीसाठी संतुलित आहार संदर्भात स्टॉल लावण्यात आले होते व सर्व पालकांना महत्त्वाची माहिती देण्यात आली. पालकांना व बालकांना आरोग्य तपासणी शिबिरामार्फत वैद्यकीयदृष्ट्या माहिती मिळावी व तपासणी सुरळीत सुरू ठेवण्यासाठी १०८ या रुग्णवाहिकेच्या मदतीने आरोग्य शिबिरास पोहोचवण्यास आले व सर्वांसाठी संतुलित आहार उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी आमदार शांताराम मोरे, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, जगन्नाथ म्हाप्रळकर विकास फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास म्हाप्रळकर, एकात्मिक प्रकल्प अधिकारी वैशाली दाभाडे, बालरोग तज्ञ डॉ. यशवंत सदावर्ते, तालुका आरोग्य अधिकारी माधव वाघमारे, श्रमजीवी संघटनेचे महेंद्र निरगुडा, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती गावडे, तालुका समूह संघटक मयुरी काबाडी उपस्थित होते. तसेच आठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तालुका विभागातील विविध संवर्गातील अधिकार, कर्मचारी, गटप्रवतर्क, आशा स्वयंसेविका, पालक या शिबिरात सहभागी झाले होते.
“कुपोषणाच्या निर्मूलनासाठी आम्ही वाटचाल सुरू केली आहे. मुलांचे आरोग्य हेच आपले भविष्य आहे” असे मार्गदर्शन तालुका आरोग्य अधिकारी यांनी पालकांसोबत संवाद साधताना सांगितले.
लोकसहभागातून तालुकास्तरीय आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाला आहे. कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.