मुंबई,12 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या समवेत, कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे,अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, स्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, संबंधित अधिकारी यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री. यादव यांनी भेटी दरम्यान ईव्हीएम मशीन, स्ट्रॉंग रूम सुरक्षा आणि सुरक्षितता याबाबत स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून स्वतः सर्व जागेची पाहणी करून आढावा घेतला. निरंतर मतदार नोंदणी ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज बाबत केलेली कार्यवाही, नवमतदार नोंदणी, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतदान केंद्र, आरक्षित मतदार केंद्र, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर किमान सुविधाचा आढावा, राष्ट्रीय सेवा तक्रार पोर्टल (NGSP)वरील तक्रारीबाबत तातडीने निपटारा करणे, मतदान केंद्रातील व्यवस्थापन,वेब कास्टिंग, रूट मॅप, सेक्टर मॅप, क्षेत्र नकाशा, संप्रेषण योजना (Communication Plan), मतदान कक्षात मतदार सहाय्यकांच्या नियुक्ती,वाहन व्यवस्था याबाबत सविस्तर आढावा घेऊन स्थानिक काही अडचणी आहेत का जाणून घेतल्या.
मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतदान प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी भेटी दरम्यान स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सोबत चर्चा संबंधित अधिकारी यांनी दिले.
काल कुलाबा,मलबार हिल,मुंबादेवी,भायखळा विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. तर आज धारावी,सायन कोळीवाडा,माहिम,वडाळा विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करून निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी आपली कर्तव्य चोखपणे बजावीत आणि मतदान केंद्रावरील नियमितपणे स्थितींचा आढावा घ्यावा अशा सूचना निवडणूक अधिकारी श्री.संजय यादव यांनी यावेळी दिल्या.
नवीन मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत आणि मतदार केंद्रातील बदल व ईव्हीएम मशीन, स्ट्रॉंग रूम संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना विश्वासात घ्यावे, अशा सूचनाही श्री. यादव यांनी यावेळी दिल्या.