Thursday, December 12 2024 7:50 pm

लोकसभा निवडणुकीसाठी ४५० मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

मुंबई 19 : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी केंद्राचे संपूर्ण नियंत्रण करणार आहेत. युवा कर्मचारी नियुक्त एकूण 450 मतदान केंद्रे राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या सेवेत विविध विभागांमध्ये युवा कर्मचारी आहेत. अशा सर्व युवा कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूकीचे कामकाज देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये वेगवेगळया जबाबदाऱ्या देऊन युवा कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. युवा मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीपासून निवडणूक आयोगाने नवीन उपक्रम राबविण्यास पुढाकार घेतला आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील किमान एक मतदान केंद्र युवा कर्मचारी संचलित असावे यावर भर देण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. रत्नागिरी आणि नाशिकमध्ये 30, लातूरमध्ये 29 मुंबई उपनगरमध्ये 26 युवा कर्मचारी नियंत्रित मतदार केंद्र असणार आहेत. सर्वात कमी युवा कर्मचारी नियंत्रित मतदार केंद्र वाशिम, हिंगोली, गडचिरोली आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी 3 केंद्र आहेत तर नंदुरबार या जिल्ह्यात 4 युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र आहेत.

यावेळी राज्यात 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. तर एकूण 254 मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत.