ठाणे, दि. ०७ (जिमाका) : लोकसभा निवडणुका या शांततापूर्ण व आदर्श आचारसंहितेचे पालन करुन पार पाडण्यासाठी २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता नामनिर्देशित झालेल्या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावयाचे आहे. नामनिर्देशनानंतर उमेदवार निवडणुकीकरिता जो खर्च करतील त्या सर्व खर्चाचा लेखाजोखा निवडणूक खर्च निरीक्षकांकडे सर्व उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक असल्याच्या सूचना आज झालेल्या बैठकीत केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिल्या.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी करावयाचा खर्च व त्याबाबतचा लेखाजोगा या संदर्भात आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खर्च निरीक्षक श्री. चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) व श्री. राहिल गुप्ता (आयआरएस), सर्वसाधारण निरीक्षक जे.श्यामला राव, पोलीस निरीक्षक म्हणून कु. इलाक्किया करुणागरन तसेच २५ ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, नोडल अधिकारी संजय पतंगे आदी उपस्थित होते. तसेच नामनिर्देशित झालेले उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणुकीसाठी लागणारा खर्च हा निवडणूक कायद्यान्वये मान्य केलेला खर्च असून त्यात जाहीर सभा, मेळावे, भित्तीपत्रके, झेंडे, वाहने, मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिराती इत्यादींचा समावेश आहे, या खर्चाच्या प्रकारात उमेदवारांनी मान्यता केलेल्या बाबीवरील खर्च हा निवडणूक आयोगास कळविणे बंधनकारक असल्याचे या बैठकीत नमूद करण्यात आले.
उमेदवाराचा खर्च नामनिर्देशन झाल्यापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापर्यंत वा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याचा खर्च जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. जर उमेदवाराने खर्च विहीत मुदतीत सादर केला नाही तर संबंधित उमेदवार तीन वर्षाकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र राहील, अशा सूचना या बैठकीत केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिल्या.
स्वतंत्र बँक खाते, उमेदवाराची निवडणूक खर्चाची नोंदवही, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा दैनंदिन हिशेब ठेवण्याकरिता छायांकित, दैनंदिन खर्च वही, बँक नोंदवही, रोकड वही, कायदेशीर तरतूदी, निवडणूक खर्चाचा हिशेब, सार्वजनिक सभा, मेळाव्यांचे सनियंत्रण, हेलिकॉप्टरचा व इतर वाहतूक खर्च, हेलिकॉप्टर / विमान खर्च, पत्रके, भित्तीपत्रके इत्यादींचा मुद्रणाचे सनियंत्रण, निवडणूक कार्याच्या दरम्यान वाहनांच्या वापराचे सनियंत्रण आदीची माहिती यावेळी उपस्थित उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च तपासण्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. दि.०९ मे २०२४, २) दि.१३ मे २०२४ व ३) दि.18 मे 2024. या असून सहाय्यक खर्च निरीक्षक यांचे कार्यालय, करमणूक कर शाखा, ४ था मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे सकाळी १०.०० वाजेपासून ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत तपासणी केली जाणार आहे.
उमेदवार/प्रतिनिधींनी सर्व प्रकारच्या नोंदवह्या जसे की, दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, संबंधित प्रमाणके/देयके (खर्चाच्या पावत्या), बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह वरील नमूद ठिकाणी व दिनांकास विहीत वेळेत उपस्थित राहण्याबाबत जाहीर आवाहन या बैठकीत करण्यात आले.