ठाणे, 03 : स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशावर ब्रिटीशांचे राज्य असताना त्यांच्यामुळे आपल्याला सुराज्य मिळाले असे म्हणणारे अनेकजण होते. लोकमान्य टिळकांनी त्यांचे हे म्हणणे अमान्य केले नाही, परंतु सुराज्य आणि स्वराज्य यातील फरक सांगत स्वराज्याची सर सुराज्याला येणार नाही असे टिळकांचे ठाम मत होते. त्या काळात आजच्या सारखी साधने नव्हती, तरीही लोकमान्य टिळक संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. त्यांच्यापूर्वी असा नेता या देशात कोणी नव्हता, वेगवेगळ्या प्रांतातील नेते होते. परंतु आधुनिक भारताच्या इतिहासात लोकमान्य टिळक हे संपूर्ण भारताने स्विकारलेले पहिले नेते होते, लोकसंग्रह हा त्यांच्या चळवळीचा गाभा असल्याचे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी ठाण्यात व्यक्त केले.
ठाणे महानगरपालिकेतर्फे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित विचारमंथन या व्याख्यानमालेतील सहावे पुष्प साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाँ. सदानंद मोरे यांनी ‘स्वातंत्र्यसंग्रामातील लोकमान्य टिळकांचे योगदान’ या विषयावर गुंफले. यावेळी ठाणेकरांच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी डॉ. सदानंद मोरे यांचे ग्रंथबुके, शाल व त्यांचे रेखाचित्र देवून स्वागत केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे उपस्थित होते. या व्याख्यानमालेस ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, कवयित्री अनुपमा उजगरे, लेटस् रीड इंडिया चळवळीचे जनक प्रफल्ल वानखेडे, ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, ठाणे लघुउद्योजक संघटनेचे पदाधिकारी शिशिर जोग, विद्या प्रसारक माडळाचे डॉ. महेश बेडेकर, लेखक मकरंद जोशी यांच्यासह ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे पहिले नेते होते. आपण पारतंत्र्यात होतो, आणि पारतंत्रातून सुटण्यासाठी लढा देण्याची गरज होती. आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते, आपण गुलाम होतो आपल्याला काही करायचं स्वातंत्र्य नव्हते. लोकमान्य टिळकांच्या काळात स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यापेक्षा स्वराज्य शब्द महत्वाचा होता. स्वातंत्र्याची भाषा त्यावेळी थेट कोणी करत नव्हते. ब्रिटीशांचा काळ हा आपल्या सामाजिक राजकीय अधोगतीचा होता. उत्तरपेशवाईचा तो काळ होता, अशा काळात ब्रिटीशांनी भारत जिंकून राज्य करायला सुरूवात केली, त्यांनी त्या काळात अनेक चांगल्या गोष्टी देखील केल्या. त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याचे लोकमान्य टिळकांनी मनापासून कौतुक केले. ब्रिटीश भारतात आल्यानंतर त्यांनी भारतातल्या भारतात होत असलेली युद्ध बंद केली. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना असलेली असुरक्षितता राहिली नाही. ब्रिटीश सुसंस्कृत राज्यकर्ते मानले जायचे, त्यांचे राज्य हे कायद्याचे होते. त्यांनी कायद्याचे राज्य आणले असे मानणारे लोक होते, तसेच ब्रिटीशांमुळे आपल्याला सुराज्य मिळाले असे म्हणणारे लोक होते. त्याच्यावर टिळकांनी स्वच्छ भूमिका घेतली. ‘असेल सुराज्य पण शेवटी स्वराज्याची सर सुराज्याला येणार नाही’ हे जगाला सांगणारे टिळक हे आधुनिक इतिहासातील पहिले नेते असल्याचे डॉ. सदानंद मोरे यांनी नमूद केले.
लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांनी केलेल्या चांगल्या गोष्टी मान्य केल्या असल्या तरी टिळकांनी त्यांच्यामध्ये असलेले हितसंबंध अर्थशास्त्रीय भाषेत उघड केले. स्वराज्याच्या चळवळीतील महत्वाचा भाग हा स्वदेशी होता, टिळकांनी सर्व प्रथम स्वदेशीची चळवळ केली आणि ती चळवळ गांधीजींनी आणखीन पुढे नेली. स्वदेशी चळवळीचे अर्थशास्त्र टिळकांनी निर्माण केले असल्याचेही डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.
लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी असून प्रत्येक संकटाचे संधी मध्ये रूपांतर करणारे होते. सहा वर्षे मंडाले येथील तुरुंगात असताना या वेळेचा उपयोग त्यांनी गीता रहस्य लिहण्यासाठी केला. भगवद् गीतेतील लोकसंग्रह या शब्दाचा अवलंब करत टिळकांनी कार्य केले. अशी माहिती डॉ. सदानंद मोरे यांनी उपस्थितांना दिली.
भारत, महाराष्ट्र पारतंत्र्यात होते. 1857 साली शिपायांनी केलेला उठाव फसल्यामुळे ब्रिटीश सरकार अंजिक्य आहे, आपण त्यांचे काहीही करु शकत नाही अशी भावना जनमाणसांत निर्माण झाली. जे आहे ते स्वीकारले पाहिजे अशी सार्वित्रिक भावना झाली. ब्रिटीशांकडे शस्त्रास्त्रे होती. ब्रिटीशांनी भारतामध्ये शस्त्रास्त्र बंदीचा कायदा केला. त्यामुळे लढायचं कसा हा प्रश्न पडला. ब्रिटीशांची यंत्रणा सक्षम होती., अशा वेळी टिळकांनी स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. त्याला वैचारिक स्पष्टता दिली.
1885 मध्ये काँग्रेसची स्थापना व्ह्यूम नावाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याने केली. सैन्यामध्ये बंड झाले तसे पुन्हा होऊ नये यासाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली. या काँग्रेसच्या अधिवेशनात सरकारकडून जे आपणास हवे आहे त्याची चर्चा करुन निवेदने तयार केली जात व ती सरकारला देण्यात येत असत. या काँग्रेसमध्ये बहूसंख्य मवाळ मतवादी नेते होते. टिळकांना ते मान्य नव्हते. सुरतच्या अधिवेशनात यावरुन मवाळ आणि जहाल मतवाद्यांमध्ये तंटा झाला त्यावेळी टिळकांना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. काँग्रेस मधून काढून टाकलेले टिळक हे पहिले नेते होते. पण त्यांनी काँग्रेस सोडली नाही. एक दिवस आपण याच काँग्रेसचे सर्वोच्च नेता होऊ हा निश्चय त्यांनी केला.
टिळकांच्या नेतृत्वाचे असे असंख्य पैलू आहेत. महात्मा गांधी यांचे नेतृत्व स्वातंत्र्य लढ्यात उभे राहिले आणि गांधी युग सुरु झाले पण हे आपण समजून घ्यायला हवे असे सांगत डॉ. सदानंद मोरे यांनी टिळक ते गांधी या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास रसिकांसमोर उलगडला.