Monday, March 8 2021 5:47 am

लहान मुलांना मारहाण प्रकरण : पोलीस बापासह आईला अटक

नाशिक : पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांचा निष्ठूर बाप प्रचंड छळ करत असल्याची घटना उघड झालीय. इगतपुरीतला हा प्रकार उघड झालाय. राहुल विजय मोरे या निष्ठूर रेल्वे पोलीस बापाने आपल्या पाच आणि आठ वर्षांच्या मुलांना प्रचंड मारहाण केलीय. याप्रकरणी निदर्यी पोलीस बापासह सावत्र आईला इगतपूरी पोलिसांनी अटक केलीय.

दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आलंय. पाच वर्षांच्या प्रियांशू या मुलीच्या हाताला चटके दिले तर आठ वर्षांच्या हिमांशू या मुलाला लाकडाने मारहाण केलीय. राहुल मोरे हा रेल्वे पोलिसात नोकरीला आहे. या मुलांची आई हयात नाही.

आई गेल्यावर ही मुलं त्यांच्या आजीकडे राहायला गेली. पण गेल्या दोन महिन्यांपासून ही मुलं बापाकडे राहायला गेल्यावर या मुलांचे बाप आणि सावत्र आईने प्रचंड हाल सुरू केले. या दोन मुलांचा होणारा शारीरिक छळ शेजारच्यांच्या लक्षात आल्याने चिडलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली.

पोलिसांनी या निर्दय बापाला अटक केलीय. त्याला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे. इगतपुरी पोलिसांनी या दोन्ही मुलांची सुटका केली आहे. या दोघांना आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची मावशी आणि मावस आजी या दोन्ही मुलांची काळजी घेत आहे.