Sunday, March 24 2019 12:18 pm

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून ४० ते ५०बेरोजगारांची फसवणूक ,दोघांना अटक

ठाणे : सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरीचे अमिष दाखवून ४० ते ५० बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या  रेल्वेच्या ठेकेदारासह  दोघा आरोपीना ठाणे खडणी विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली आहे . त्यांच्याकडून २ पिस्टल १ रिव्हॉल्वर १८ जिवंत काडतुसे तसेच रेल्वेचे बनावट रबर  शिक्के हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी  पत्रकार परिषदेत दिली .

             गुरुवारी  विनापरवाना बेकायदेशीर अग्निशस्रे विकण्यासाठी  येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक प्रशांत भुर्के यांना मिळाल्यानुसार पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी गुरुवारी  उपवन तलावाजवळ सापळा रचून आरोपी राकेश राजाराम साळुंखे (३०) रा.  कैलाशनगर  अंबरनाथ , नितीन निवृत्ती पगारे (३३) रा. आशाले पाडा  परमानंद भक्ती  पेठ उल्हासनगर यां दोघांना २ पिस्टल अग्निशास्रे,  १ रिव्हॉल्वर व १८ जिवंत काडतुसांसह अटक केली. अटक आरोपीच्या झडतीत सेंट्रल रेल्वेचे बनावट शिक्के व लेटरहेड बनवून नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांची फसवणूक करण्यासाठी कॉल लेटर्स बनविलेले मिळून आले आहे.आरोपीच्या चौकशीत अंदाजे ४५ ते ५० इच्छुक उमेदवारांना नोकरीसाठी कॉल लेटर देऊन  उमेदवाराकडून प्रत्येकी २ लाख रुपये घेतले असल्याची  कबुली दिली. या प्रकरणी अटक आरोपी राकेश हा रेल्वेचा  ठेकेदार असून त्याच्यावर १५ ते २० लाख रुपयांचे कर्ज झाल्याने त्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी हा रॅकेट सुरु केल्याची कबुली दिली तसेच लोक पैसे परत मागत  असताना धमकावत असल्याने स्वतः रक्षणासाठी नितीन यांच्याकडून पिस्टल खरेदी केल्याची कबुली दिली. नितीन हा कल्याण डोंबिवलीतील बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविकेचा पती असल्याची माहिती देवराज यांनी दिली . याप्रकरणी आरोपीना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक अविनाश महाजन करीत आहेत.