Monday, June 17 2019 4:58 am

रेतीबंदर शाळेत आरोग्य व कला शिबीराचे आयोजन आमदार श्री. आव्हाड, आयुक्त श्री. जयस्वाल यांची उपस्थिती : रूबल नागी फौंडेशनचा अभिनव उपक्रम !

पारसिक रेतीबंदर शाळेतील चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करताना आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल. सोबत रूबल नागी फौंडेशन आणि मिसाल मुंबई संस्थेच्या अध्यक्षा रूबल नागी व इतर.

ठाणे -: ठाणे महानगरपालिकेच्या पारसिक रेतीबंदर येथील शाळा क्रमांक ४९ आणि ९३ येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य आणि कला शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत ही दोन्ही शिबीरे संपन्न झाली. रूबल नागी फौंडेशन आणि मिसाल मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गेले १५ दिवस पारसिक रेतीबंदर येथील ८ झोपडपट्ट्यांमध्ये ठाणे महानगरपालिका आणि मिसाल मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने झोपडपट्ट्यांची रंगरंगोटी आणि या परिसरात मुलभूत सुविधा देण्याची कार्यवाही सुरू आहे.

आज दुपारी स्थानिक आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शाळा क्रमांक ४९ आणि ९३ येथे विद्यार्थ्यांसाठी रूबल नागी फौंडेशन आणि मिसाल मुंबई या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला शिबीर आणि चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली.

त्याचप्रमाणे डाॅ. आव्हाड आणि श्री. जयस्वाल यांनी रूबल नागी फौंडेशन आणि मिसाल मुंबई संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरालाही हजेरी लावली. यावेळी उपआयुक्त संदीप माळवी, मनीष जोशी, नगर अभियंता राजन खांडपेकर, उपनगर अभियंता कैलाश मुंबईकर, अर्जून अहिरे, उपनगर अभियंता रविद्र खडताळे, शहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, शिशणाधिकारी सौ. उर्मिला पारधे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी आदी उपस्थित होते.