Thursday, November 21 2019 3:42 am

रेतीबंदर विस्थापितांना महिन्याभरात मिळणार पर्यायी जागा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·       महापालिका करणार लॉटरी पद्धतीने वितरण

·       १०५ लाभार्थींची अंतिम यादी

·       चौपाटी प्रकल्पाच्या विस्थापितांना मिळणार नवा रोजगार

ठाणे – मुंब्रा रेतीबंदर येथील चौपाटी प्रकल्प विकासामुळे विस्थापित झालेल्या रेती व्यावसायिकांना शब्द दिल्याप्रमाणे एक महिन्याच्या आत पर्यायी जागा देण्याचे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला दिले. या रेती व्यवसायिकांना ठाणे महापालिका १ एकर जमीन देणार असून लॉटरी पद्धतीने एक महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी दिली.

चौपाटी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या रेती व्यावसायिकांच्या पुनर्वसनासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री श्री. शिंदे, आयुक्त श्री. जयस्वाल यांच्यासह आमदार जीतेंद्र आव्हाड, आमदार शांताराम मोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, प्रांताधिकारी सुदाम परदेशी, शिवसेना उपनेते व रेती व्यावसायिकांचे प्रतिनिधी दशरथ पाटील, नगरसेवक उमेश पाटील, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

रेतीबंदर येथील चौपाटी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या रेती व्यावसायिकांना घरे देण्यात येतील, तसेच त्यांना महापालिका हद्दीत प्लॉट देण्यात येईल, अशी हमी पालकमंत्री श्री. शिंदे आणि आयुक्त जयस्वाल यांनी दिली होती. त्यानुसार आजवर ३५० जणांना घरे देण्यात आली आहेत. प्लॉटसाठी १०५ लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात आली असून लॉटरी पद्धतीने या जमिनीचे वितरण महिन्याभराच्या आत करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले.

रेतीच्या साठवणुकीसाठी चौपाटीला लागून १.२ किमी लांबीची जागा देण्याची रेती व्यावसायिकांची मागणी असून याबाबत शासन स्तरावर बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच, डुबीने रेती काढण्यासंदर्भात खाडीचे पुनर्सर्वेक्षण करण्याची गरज असून त्यासाठी देखील मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्या स्तरावर पाठपुरावा करून निर्णय घेण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.