ठाणे – 2 – महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन अर्थात रेझिंग डे च्या निमित्ताने ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांना शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, पुढील आठवडाभर सायबर गुन्हे, वाहतुकीचे नियम आणि महिला संरक्षण आदी विषयांवर अभ्यासवर्ग-पथनाट्य आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.
जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रेझिंग डेच्या निमित्ताने ठाणे नगर पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या वतीने पिस्तूल, कार्बाईन, एसएलआर, ए के 47, 3 नॉट 3, टीयर गॅस गन आदी अत्याधुनिक शस्त्रांची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. तसेच, स्वसंरक्षणार्थ करावयाच्या उपायोजनांबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. या विद्यार्थ्यांना या प्रसंगी पोलीस ठाण्याच्या कामकाजाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी माहिती दिली.
दरम्यान, रेझिंग डे च्या निमित्ताने ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या वतीने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये महिलांचे संरक्षण, सायबर गुन्हे, वाहतुकीचे नियम आदींबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे स्टेशन, बाजारपेठ आदी ठिकाणी पथनाट्यांचेही आयोजन करण्यात येणार आहे, असे सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक डी. आर. जाधव, प्रशिक्षक चौधरी, पोलीस हवालदार दिलीप माने, पोलीस नाईक आरीफ तडवी, पो. ना. सानप आदी उपस्थित होते.