Wednesday, February 26 2020 10:12 am

रेंटल इमारती मध्ये राहणाऱ्या लोकांना योग्य सुविधा न पुरविल्यास त्या लोकांसह “आक्रोश लॉंग मार्च” काढणार..आमदार संजय केळकर यांचा ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना इशारा. 

ठाणे : ठाण्यातील मानपाडा येथील अँँक मे दोस्ती व अन्य ठिकाणी असलेल्या इमारतीत बाधित लोकांना राहण्यास जागा दिली आहे. परंतू त्या ठिकाणी ही लोकं नरक यातना भोगत असून महापालिकेने जर या लोकांना तात्काळ योग्य त्या सुविधा दिल्या नाहीत तर याच लोकांसह ‘आक्रोश लॉंग मार्च’ महापालिकेवर काढू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत दिला.

ठाण्यातील विविध विषयांकरिता आ. केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. अहिवार यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी नगरसेवक सुनेश जोशी, उपायुक्त श्री. बुरपुले, शहर विकास अभियंता श्री. देशमुख व अन्य विभागाचे अधिकारी, ऍड. बापू साळवे व रेंटल मध्ये राहणारे नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बाधित लोकांना राहण्यास ज्या ठिकाणी इमारतीत घरे दिली आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित पिण्याचे पाणी नाही, ड्रेनेज तुंबले आहेत, परिसरात घाणीचे साम्राज्य असून २२ ते ३० माळ्यांच्या इमारतींना चार चार लिफ्ट आहेत पण त्यातील एकच लिफ्ट चालू आहे तर बाकी बंद असल्याने लोकांचे विशेषतः जेष्ठ नागरिकांचे भयंकर हाल होत असल्याचे आ. केळकर यांनी या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणले. या विषयाबाबत आ. केळकर यांनी आक्रमक भूमिका घेऊन महापालिकेच्या दुर्लक्षामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या लोकांना योग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत असे संबंधित अधिकाऱयांना सांगितले अन्यथा ‘आक्रोश लॉंग मार्च’ काढण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला.

या बैठकीत आ. केळकर यांनी शहरात वाढणारी अतिक्रमणे, रस्ते याबाबत चर्चा करून त्यांनी ठाणे शहरातील उद्याने ही महापालिकेने संस्थाना अटी व शर्थी वर दत्तक दिल्यास त्यांची देखभाल व्यवस्थित होऊ शकते, हा मुद्दा मांडतातच अतिरिक्त आयुक्तांनी त्यास सकारात्मक उत्तर दिले.