Sunday, July 5 2020 9:12 am

रुग्णालयाची निर्मिती, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शिर्डीचे साई संस्थानही पुढे सरसावले

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शिर्डीचे साई संस्थानही पुढे सरसावले आहे. साई संस्थानाच्या भक्त निवासात कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरचा उपयोग शिर्डी परिसरातील कोरोना रुग्णांसह अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांना देखील होणार आहे.

शिर्डीचे साई संस्थान हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. राज्यात आणि देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत साई संस्थान नेहमी वेगवेगळ्या स्वरूपाची मदत करत असते. आता कोरोनाच्या संकटातही साई संस्थानाने पुढाकार घेतला आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी साई संस्थानाने या आगोदरच राज्य सरकारला 51 कोटींची मदत केली आहे. आता आणखी पुढाकार घेत साई संस्थानने आपल्या भक्त निवासाचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये केले आहे.

या कोविड सेंटरमध्ये 144 बेड आहेत. हे कोविड सेंटर रुग्णसेवेसाठी सज्ज झाले असून, लवकरच ते सुरू होणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.

साई मंदिर दर्शनासाठी बंद झाल्यापासून साई संस्थानचे भक्त निवास रिकामे पडले होते. या वास्तूचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी करत साई संस्थानने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.