Monday, October 26 2020 4:19 pm

रुग्णांची लूट करणार्‍या खासगी रुग्णालयांना नवी मुंबई पालिकेचा दणका

नवी मुंबई : कोरोना रुग्णांना भरमसाठ देयके आकारून त्यांची लूट करणार्‍या खासगी रुग्णालयांना नवी मुंबई महापालिकेकडून जोरदार दणका देण्यात आला आहे. रुग्णांना आकारलेले अतिरिक्त ३२ लाख रुपये सप्टेंबरमध्ये पालिकेने वसूल केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये तब्बल एक कोटी रुपये रुग्णांना परत मिळवून दिले आहेत. त्यामुळे आर्थिक लूट झालेल्या कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांच्या बिलांसदर्भातील तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक तसेच स्वतंत्र देयक तपासणी केंद्राची निर्मिती केली होती. या हेल्पलाईन क्रमांकावर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. या तक्रारींची दखल घेत देयक तपासणी केंद्राने सप्टेंबरमध्ये नवी मुंबईतील विविध रुग्णालयांच्या बिलाचे ऑडिट करून रुग्णांना ३२ लाख रुपये परत केले.

तसेच ऑक्टोबरमध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार ४१ लाख ३८ हजार ७९७ इतकी रक्कम परत केली. या कारवाईबरोबरच पालिकेच्या विशेष लेखा पथकाकडे प्राप्त झालेल्या ८१२ देयकांपैकी ६६२ देयकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यातील ६२ लाख ८८ हजार ८२३ रुपये इतक्या रकमेचा परतावा रुग्णांना देण्याचे निर्देश पालिकेने रुग्णालयांना दिले आहेत.

यामध्ये वाशीचे फोर्टीज रुग्णालय १७ लाख ८६ हजार ४२५, घणसोलीचे फ्रीझॉन रुग्णालय १४ लाख ४१ हजार ३३५, नेरळमधील सनशाईन रुग्णालय १२ लाख ३२ हजार २७२, सानपाडामधील एमपीसीटी रुग्णालय १० लाख ९० हजार ९४०, वाशीतील एमजीएम रुग्णालय ७ लाख ३७ हजार ८५१ रुपये परत करण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करणार्‍या रुग्णालयांवर कारवाई करा, अन्यथा पालिका आयुक्तांना खासगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून पुरस्कार देण्याचा इशारा मनसेने दिला होता. वाढीव दराने देयके वसूल करीत कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करणार्‍या खासगी रुग्णालयांविरोधात मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आवाज उठविल्यानंतर महापालिकेने रुग्णालयांना दणका दिला.