Sunday, July 5 2020 8:54 am

रुग्णवाहिका आणि उपचारासाठी भाजपा आमदार संजय केळकर यांचा विकासनिधी…

ठाणे : ठाणे शहरात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून  रुग्णवाहिकांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. आ.संजय केळकर यांनी ही निकड ओळखून रुग्णवाहिका खरेदीसाठी स्थानिक विकास निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याचबरोबर आणखी अतिरिक्त निधी गरीब रुग्णांच्या उपचार खर्चासाठी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे गोरगरिब रुग्णांना संकटकाळात दिलासा मिळाला आहे.रुग्णवाहिका कमी प्रमाणात असल्याने ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर रुग्णालयात दाखल होता येत नाही, त्यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याचे प्रकारही घडत आहेत. खाजगी रुग्णवाहिका चालक अवाच्या सवा भाडे आकारत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक झळ बसत आहे. याबाबत आ.संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा करुन दरनिश्चितीही करवून घेतली आहे.

ठाण्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत अद्याप रुग्णवाहिका कमी असल्याने आ.संजय केळकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपये नवीन रुग्णवाहिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांअभावी गोरगरीब रुग्णांचे होणारी हेळसांड थांबणार आहे.

गरीब रुग्णांना उपचाराचा खर्चही परवडत नाही, अशावेळी त्यांच्या जिवावर बेतण्याची शक्यताही वाढते. प्रशासनाने अनुकूलता दर्शवल्यास आ. केळकर यांनी यासाठी आणखी २० लाख रुपये उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवली आहे.