Wednesday, March 26 2025 5:26 pm

राष्ट्रीय लोकअदालतीत २१ हजार ५७३ प्रलंबित प्रकरणे निकाली काढून संपूर्ण राज्यात ठाणे सातत्याने अग्रेसर

ठाणे, 14 :- मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात एका वर्षात एकूण ४ राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते. दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी झालेली राष्ट्रीय लोक अदालत या वर्षीची शेवटची लोक अदालत होती. त्यामध्ये ठाणे जिल्हयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या एक वर्षातील झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचा आढावा घेतला असता ठाणे जिल्ह्यातील पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीचे महत्व जाणून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यामुळे न्यायालयात प्रलंबित असलेले एकूण ८६ हजार ७४ प्रकरणे निकाली निघाली आहेत.
मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्यामार्फत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व अति. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये ठाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (प्र.) तथा ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष श्री.अमित एम. शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ईश्वर कां. सूर्यवंशी यांच्या समन्वयाने शनिवार, दि.०९ डिसेंबर, २०२३ रोजी “राष्ट्रीय लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले होते.
या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये एकूण २१ हजार ५७३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली झाली असून १८ हजार ५१० दावा दाखल पूर्व प्रकरणे अशी मिळून एकूण ४० हजार ८३ तडजोड पात्र असलेली प्रकरणांमध्ये पक्षकारांच्या सामंजस्याने तडजोड करुन निकाली झाली आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयातील वाढता ताण लक्षात घेता प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आवश्यक असून प्रलंबीत प्रकरणे निकाली काढल्याने पक्षकारांस तात्काळ न्याय मिळतो व न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होतो, या आवाहनास पक्षकार, विधीज्ञ, शासकीय, निमशासकीय विभाग, बँकांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष, श्री. अमित एम. शेटे व सचिव श्री. ईश्वर कां. सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वीततेसाठी तालुका विधी सेवा समित्या, बँकेचे अधिकारी, फायनान्स व इन्शुरन्स कंपन्यांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत लोकअदालतीपूर्वी अनेकवेळा बैठका घेवून पक्षकारांना त्यांच्या प्रकरणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आवाहन केले होते व या सर्व प्रयत्नांमुळे राष्ट्रीय लोक अदालतीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले व त्यामुळे प्रलंबित २१ हजार ५७३ प्रकरणे निकाली निघाली अशी माहिती सचिव, श्री. ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली. राष्ट्रीय लोकअदालत हा लोकांच्या समस्या सोडविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
या निकाली प्रकरणांमध्ये न्यायालयांकडील प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण रक्कम रू.१,७०,७८,२७,६५७/- व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण रू.२८,६५,७२,५१५/-अशी एकूण रू.१,९९,४४,००,१७२/-एवढया रकमेचा समावेश आहे.
मागील लोकअदालतीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दुसऱ्या वेळेस Debts Recovery Tribunal (DRT) या कर्ज वसूली प्राधिकरणाकडील प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३१ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली असून त्याप्रकरणांचे तडजोड मूल्य रक्कम रु.48 कोटी 12 लाख 45 हजार ५२४/- एवढे आहे.
ठाणे जिल्हयात एकूण २९४ मोटार अपघात नुकसान प्रकरणे निकाली काढून मयतांचे वारस व जखमींना दिलासा. मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणात एकूण २९४ प्रकरणांत तडजोड होवून पिडीतांना रक्कम रू.२५,९५,०३,९६०/-भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. या प्रकरणांपैकी ठाणे मुख्यालयात एकूण १८२ प्रकरणांमध्ये तडजोड होवून रू.१५,६७,०४,९६०/-एवढी नुकसान भरपाई पिडीतांना मंजूर करण्यात आले आहेत.
लोक अदालतमुळे सर्वात जलद गतीने केवळ ३० दिवसात
मोटार अपघात प्रकरण निकाली काढून मयतांचे वारस व जखमींना दिलासा
मोटार अपघात दावा न्यायाधीकरण, ठाणे पॅनल प्रमुख न्यायाधीश श्रीमती सोनाली एन.शाह यांच्या पॅनलवर आजच्या लोकअदालतीमध्ये इतिहास घडला. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पोलीस स्टेशन येथे दाखल एका मोटार अपघात दावा प्रकरणात खाजगी नोकरी करणारा श्रीधर लक्ष्मण राव, वय वर्षे ३१ या स्कूटरस्वार तरूणाला ट्रकने धडक दिल्यामुळे अपघातात मृत्यु पावला होता. त्याच्या ६५ वर्षीय वृध्द माता पित्याला केवळ ३० दिवसांत ई-प्रणालीद्वारे दाखल केलेल्या प्रकरणात सरकारी नॅशनल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीकडून उच्चत्तम रक्कम नुकसान भरपाई म्हणून रूपये ८५ लाख मंजूर करण्यात आले. हा भरपाई दावा हा ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात ई-प्रणालीद्वारे दाखल प्रकरणातील सर्वात जलद गतीने निकाली निघालेला आहे व या यशस्वीतेचे श्रेय लोक अदालतला जाते व ही बाब उल्लेखनीय आहे, असे संबोधित करताना राष्ट्रीय लोकअदालतीचे खरे उद्दिष्ट साकारणाऱ्या सर्व न्यायाधीश वकील कर्मचारी वर्ग, पक्षकार यांच्यासोबतच उच्चतम नुकसान भरपाई अर्जदाराला मिळवून देणारे इन्शुरन्स कंपनीचे वकील श्री. केशव पुजारी व पीडितांकडून वकील श्री. सचिन माने यांचे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. अमित शेटे यांनी कौतुक केले. त्याचबरोबर आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनी कडून रूपये ८१ लाखाची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वकील श्री. राम यादव व टाटा एआयजी कडून रूपये ७८ लाख ५० हजाराची नुकसान भरपाई अर्जदारांना मिळवून देण्यासाठी वकील श्री. सचिन माने यांनी विशेष प्रयत्न केले.
सर्वात जास्त रकमेचा दोन कोटी आठ लाख पन्नास हजार रूपये
नुकसान भरपाई वसई न्यायालयाकडून मंजूर
तसेच वसई न्यायालयात एका मोटार अपघात दाव्यामध्ये प्रकरणात गो डिजिटल इन्शुरन्स कंपनीकडून उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून रूपये २ कोटी ०८ लाख ५० हजार मंजूर करण्यात आले.
मोटार अपघात दावा न्यायाधीकरण यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांमध्ये मयत व्यक्तीचे वारसांना जास्तीत जास्त मोटार अपघात नुकसान भरपाई मंजूरीकरिता जिल्हा न्यायाधीश-१ श्री.ए.एम.शेटे, जिल्हा न्यायाधीश-२ श्री. ए.एन.सिरसीकर, मोटार अपघात दावा न्यायाधीकरण, ठाणे च्या सदस्य श्रीमती एस.एन.शाह, जिल्हा न्यायाधीश-४ ठाणे, श्री.पी.एस.विठलाणी, जिल्हा न्यायाधीश-५कल्याण, श्री.पी.आर.अष्टूरकर, जिल्हा न्यायाधीश-१ पालघर श्री.ए.एस.प्रतिनिधी, जिल्हा न्यायाधीश- २ पालघर श्रीमती ए.व्ही. चौधरी-इनामदार तसेच जिल्हा न्यायाधीश २, वसई, श्री.एस.व्ही.खोंगल, जिल्हा न्यायाधीश-३, वसई श्री. आर.डी.देशपांडे, जिल्हा न्यायाधीश- १, बेलापूर, श्री. पी.ए.साने यांनी विशेष प्रयत्न केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे चे सचिव श्री. ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलीस ई-चलनाद्वारे कारवाई करतात. हा दंड अनेक वाहनचालक प्रलंबित ठेवत असून त्याच्या वसुलीसाठी या लोकअदालतीमध्ये वाहतूक विभागाची ट्रैफिक ई-चलनाची प्रकरणे वाद दाखलपूर्व स्वरूपात ठेवण्यात आली होती. त्यामध्ये ७ हजार ४८८ प्रकरणे तडजोड होवून निकाली निघाली व त्यामधून वाहतूक विभागाला ३८ लाख ३० हजार १०० रूपयांचा निधी वसूल होवून मिळाला. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांना आभासी पध्दतीने नोटीस पाठविण्यात आलेला होत्या.
दावा दाखलपूर्व प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद
केवळ चार दिवसात कमर्शियल दावा निकाली
लोक अदालतीचे महत्व लक्षात घेवून पक्षकारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. कल्याण न्यायालयात एका दाखलपूर्व कमर्शियल दाव्यामध्ये १,६५,००,०००/- रूपयांची यशस्वी तडजोड करण्यात आली. हा दावा लोकअदालतीपूर्वी फक्त ०४ दिवस आधी दाखल झाला होता.
या लोकअदालतीस ठाणे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय न्यायिक अधिकारी, वकील संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रशांत कदम तसेच ठाणे वकील संघटनेचे पदाधिकारी व सर्व विधीज्ञ सदस्य, सरकारी वकील, वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनय राठोड, नवी मुंबईचे उपायुक्त तिरूपती काकडे तसेच पोलीस प्रशासन, बँका, इन्शुरन्स कंपनी, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कर्मचारी, संगणक कक्षातील कर्मचारी यांच्या परिश्रमाने व उत्स्फूर्त प्रतिसादाने मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळालेले आहे, असे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वर कां. सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
“राष्ट्रीय लोकअदालत” बाबत ठळक बाबी
• मोटार अपघातांच्या एकूण २९४ प्रकरणांमध्ये तडजोड होवून रूपये २५ कोटी ९५ लाख ०३ हजार ९६०/- नुकसान भरपाई मंजूर.
• राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ४००८३ प्रकरणे निकाली. जिल्हयात १ अब्ज ९९ कोटी ४४ लाख १७२ रूपयांची तडजोड”.
• १०८ वैवाहिक प्रकरणे सामंजस्याने निकाली त्यापैकी घटस्फोटापर्यंत गेलेली ५ जोडपी संसाराकडे.
• एन.आय. अॅक्ट कलम १३८ ची ९४५ प्रलंबित प्रकरणे निकाली. तडजोडीची रक्कम रू. ३२,४९,३७,९९०/-.
• ठाणे जिल्हयात एकूण ४००८३ प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे निकाली. एकूण १,९९,४४,००,१७२/- इतक्या रक्कमेची तडजोड.
• त्यापैकी २१५७३प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली. प्रलंबित प्रकरणांत रक्कम रु.१,७०,७८,२७,६५७/- इतकी रक्कमेची तडजोड.
• दाखलपूर्व १८५१० प्रकरणे निकाली. दाखलपूर्व प्रकरणांत रक्कम रु.२८,६५,७२,५१५/- इतकी रक्कमेची तडजोड.
• किरकोळ स्वरूपाच्या ३८०४ फौजदारी प्रकरणात गुन्हा कबूली.
• या लोकअदालतमध्ये Debts Recovery Tribunal (DRT) प्राधिकरणाद्वारे १३१ प्रकरणे निकाली. एकूण तडजोडीची रक्कम रू. ४८ कोटी १२ लाख ४५ हजार ५२४/-.
• या लोकअदालतीमध्ये किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास ३८०४ आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम रूपये ३५ लाख ९७ हजार जमा केली.
• ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद.
• १० ते १५ वर्ष जुने असंख्य प्रकरणे निकाली.
• वैवाहीक प्रकरणे तडजोडीस मोठ्या प्रमाणात यश. एकूण १०८ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली असून अनेक संसार जुळले.
• दाखलपूर्व बँक रिकव्हरीची एकूण ५३७ प्रकरणे निकाली. रु. २,१६,९९,९५६/- इतक्या रकमेची तडजोड.
• एन.आय.अॅक्ट कलम १३८ची ९४५प्रलंबित प्रकरणे निकाली. तडजोडीची रक्कम रू. ३२,४९,३७,९९०/-.
• प्रॉपर्टी टॅक्स/रेव्हेन्युची दाखलपूर्व ६०११ प्रकरणे निकाली. तडजोडीची रक्कम रू.११,३४,०२,६०८/-.
• पाणीपट्टीची दाखलपूर्व ४११२ प्रकरणे निकाली. एकूण तडजोडीची रक्कम रू.६,३९,२५,५५५/-.