महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन
ठाणे 14 :- राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहामध्ये महिला व बालविकास विभागाच्या संबंधी विविध शासकीय विभागांची आढावा बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका तसेच ठाणे जिल्ह्यातील पोलीस कार्यालय यांनी महिला सुरक्षा, आरोग्य व इतर संबंधीत केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या बैठकीस ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदूराणी जाखड, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी संजय बागूल, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त समाधान इंगळे, उल्हासनगर भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विठ्ठल डाके, ठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संजय बागूल, आदिवासी सहाय्यक प्रकल्पाधिकारी श्रीमती निवेदिता गलांडे, ठाणे पोलीस आयुक्तालयाचे ठाणे उपायुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त, सहेली संस्था उल्हासनगर यांच्या अध्यक्ष श्रीमती राणीताई भैसने, श्री साई सेवा संस्था भिवंडी डॉ.स्वाती सिंग, कॉज फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना मोरे व वुमन्स वेल्फेअर फाउंडेशन मीनाक्षी उज्जैनकर, वर्षा भोसले व जिल्ह्यातील अन्य महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती शर्मा म्हणाल्या की, महिलांच्या सक्षमीकरणावर भर देवून त्यांच्या तक्रारी येवू नयेत, यासाठी आपण सर्वांनी आणि प्रत्येक शासकीय विभागाने सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संबंधित विभागांनी विविध उपक्रम, कार्यक्रम सुरु करावेत. महिला सक्षमीकरणासाठी महिलांना सर्व क्षेत्रात संधी देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना योग्य वेळेत योग्य प्रकारे पोहोचणे आवश्यक आहे. जर असे होत नसेल तर त्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. सुरक्षा, आरोग्य, शिक्षण या विषयांबाबत विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सर्व यंत्रणांनी एकत्र येवून महिलांच्या प्रश्नांवर, अडीअडचणींवर एकत्रित विचार मंथन करुन महिला सक्षमीकरणाबाबत येणाऱ्या अडचणी दूर करणे अपेक्षित आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करावेत ,त्याकरिता निधीसाठी मागणी करावी, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी विविध शासकीय विभागांनी सादरीकरणाद्वारे त्यांच्या विभागांनी महिला सक्षमीकरणाबाबत केलेल्या कार्याची माहिती अध्यक्षांना दिली.
बैठकीपूर्वी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या संस्थेमार्फत महिला महिला विकासासाठी विकासासाठी केलेले क्षेत्रातील उल्लेखनीय कामाचे सादरीकरण राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांच्यासमोर केले.
याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संजय बागूल, तहसिलदार युवराज बांगर आदि उपस्थित होते. तसेच बैठकीच्या वेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड यांनी श्रीमती शर्मा यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री महेंद्र गायकवाड यांनी केले.