Friday, December 13 2024 12:18 pm

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात अधिकारी, संस्थांचा गौरव

ठाणे,24 : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ठ कार्य केलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी, संस्थांचा गौरव करण्यात आला.
25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम तरुण मतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी, मतदारांमध्ये मतदार नोंदणी व मतदानासंदर्भातील जनजागृती निर्माण करण्यासाठी 13 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी महानगरपालिका आयुक्त मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी, सामान्य प्रशासनचे उप जिल्हाधिकारी गोपनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, ठाणे तहसिलदार युवराज बांगर, वृत्त निवेदक मिलिंद भागवत, बिग बॉस मराठीमधील स्पर्धक व मिस्टर इंडिया 2021 डॉ. रोहित शिंदे, कायरो येथील जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलेले क्रीडा पटू रुद्रांक्ष पाटील, शुभकुंदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण नागरे,अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, ठाणे सिटीझन फाऊंडेशन व महाराष्ट्र गो ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन, किन्नर अस्मिता संस्थेच्या सिमरन सिंग हे निवडणूक दूत उपस्थित होते.
यावेळी नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप, दिव्यांग, तृतीयपंथी बेघर, महिला, कातकरी इ.मतदारांचा गौरव करण्यात आला. तसेच मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये योगदान देणाऱ्या सामाजिक संस्थांचा व वर्षभरात ठाणे जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
*लोकशाही टिकविण्यासाठी मतदानापलिकडे लोकशाही प्रक्रियेत सहभाग हवा – गिरीश कुबेर*
श्री. कुबेर म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात मतदार नोंदणीचे खूप चांगले काम झाले आहे. मतदानाचा दिवस आणि बोटाला शाई लागणे सोडलं तर आपला या लोकशाही व्यवस्थेशी संबंध आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो का. ठाणे शहरासारख्या शहरांमध्ये गृहसंकुले वाढत आहेत. या व्यवस्थेमध्ये नागरिकांचा एक समूह या देशात असा आहे की, मतदान करणे व पासपोर्टशी संबंधित आहे. सहभागी असलेल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपला सहभाग काय हा प्रश्न नवतरुण मतदारांनी विचारायला हवे. त्यामुळे मतदानाचा अधिकाराचा व मतदानाचे गांभिर्य ठेवले पाहिजे. लोकशाही टिकवायाची असेल व तिचे मूल्य आपल्याला असेल तर मतदानापलिकडे लोकशाही प्रक्रियेस सहभागी असणे आवश्यक आहे. परिणामकारक लोकशाही असेल तरच ती टिकेल. लोकशाहीचे सत्व टिकविण्यासाठी मतदानापलिकडे जाऊन जास्तीत जास्त सहभाग असणे महत्त्वाचे असते. सन 2040 मध्ये आपण जगातील सर्वात मोठी राष्ट्रशक्ती असू. त्याअनुषंगाने लोकशाहीचा विचार करायला हवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तृतीयपंथीय व देहविक्रय करणाऱ्या जास्तीत जास्त महिलांना समाविष्ट केल्याबद्दल ठाणे जिल्हा निवडणूक कार्यालयाचे श्री. कुबेर यांनी अभिनंदन केले.
*निरंतर मतदार नोंदणी प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी व्हावे – राजेश नार्वेकर*
श्री.नार्वेकर म्हणाले की, सर्वसमावेश निवडणूक व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहे. मतदार पुननिरीक्षण कार्यक्रम महत्त्वाचा आहे. निवडणूक अधिकारी व कर्मचारी अनेक अडचणी समोर जाऊन हे काम करत असतात. ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीत 8 लाख 18 हजार छायाचित्र नसलेली नावे होते. ही नावे कमी करण्याचे आव्हान जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे. मतदारयादी तयार करतांना खूप जबाबदारी असते. चुकून एखाद्या व्यक्तीचे नाव कमी झाले, तर राष्ट्रीय कर्तव्यापासून वंचित ठेवले जाण्याची भिती असते. या वर्षी पहिल्यांदाच छायाचित्र नसलेली शून्य मतदार आहेत. यासाठी नागरिकांची महत्त्वाची साथ लाभली. त्यामुळे निरंतर मतदार नोंदणीच्या प्रक्रियेत सहभागी घेऊ व मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे निर्धार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघामघ्ये मतदार छायाचित्र नसलेल्या मतदरांची संख्या शून्य झालेली आहे. वय 18 पूर्ण झालेल्या नागरिकांची मतदार नोंदणी मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती, युवा मतदारांची नोंदणी, महिला, बेघर, दिव्यांग आदी लक्ष्यित घटकांतील मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी श्री. मिलिंद भागवत यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांना निपक्षीय मतदान करेन अशी शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज चव्हाण केले. उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी आभार मानले.