ठाणे, 24 : राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून 25जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून उद्या, दि.25 जानेवारी 2023 रोजी ठाण्यात 13 वा राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनमध्ये दु.12.00 वा होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
या कार्यक्रमास लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.वृत्त निवेदक मिलिंद भागवत ,नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर व बिग बॉस मराठीमधील स्पर्धक व मिस्टर इंडिया 2021 डॉ. रोहित शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास कायरो येथील जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलेले क्रीडा पटू रुद्रांक्ष पाटील व ठाणे विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वर सुर्यवंशी प्रमुख उपस्थिती असणार आहे. निवडणूक दूत तथा शुभकुंदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण नागरे, अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, ठाणे सिटीझन फाऊंडेशन व महाराष्ट्र गो ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन, किन्नर अस्मिता संस्थेच्या सिमरन सिंग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे क्षेत्र समन्वयक हरेश सुदाम वाघे हे निवडणूक दूत कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप,दिव्यांग,तृतीयपंथी बेघर,महिला,कातकरी इ.मतदारांचा व मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये योगदान देणाऱ्या सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे.तसेच मागील वर्षभरात ठाणे जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम तरुण मतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी, मतदारांमध्ये मतदार नोंदणी मतदान करण्याच्या जबाबदारीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.