मुंबई, 8 : ‘स्वच्छ मुख आरोग्य’ कार्यक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय टूथब्रश दिवस’- ०७ नोव्हेंबर रोजी जनमानसांमध्ये मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन आज करण्यात आले.
राष्ट्रीय टूथब्रश दिवसाचे औचित्य साधून स्वच्छ मुख अभियानांतर्गत वैद्यकीय शिक्षण व संचालनालय, मुंबई व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबईतर्फे तयार केलेल्या जनजागृतीपर पत्रिकेचे प्रकाशन मंत्रालयात मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय टूथब्रश दिवस जनमाणसांमध्ये मौखिक आरोग्यविषयक जनजागृती तसेच दिवसांतून दोन वेळा टूथ ब्रशिंगविषयी जागरुकता व्हावी, या उद्देशाने साजरा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दातांच्या किडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या वयातच लहान मुलांना टूथब्रशिंगविषयी जागरुकता व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जनजागृतीसाठी विविध दंत महाविद्यालये, सामाजिक संस्था हिरिरीने पुढाकार घेऊन पोस्टर्स, बॅनर्स, रॅली, पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करतात.
यावेळी मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते पर्यावरणपूरक दंत ब्रश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक (वैद्य) अजय चंदनवाले, डॉ. पाखमोडे (दंत),अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड, डॉ. संध्या चव्हाण, डॉ. राजेश गायकवाड, डॉ. सूर्यकांत पोवार, आशिष जळमकर यांची उपस्थिती होती. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव द. निवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तिका तयार करण्यात आली आहे.