ठाणे महापालिकेने केलेल्या कार्यवाहीबद्दल व्यक्त केले समाधान
ठाणे 18 : ठाणे महापालिकेमार्फत अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, पद भरतीतील आरक्षणाची अंमलबजावणी, अनुकंपा तत्त्वावर होणारी भरती यांचा आढावा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य श्री. सुभाष पारधी यांनी शनिवारी घेतला. या योजनांच्या कार्यवाहीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, अंमलबजावणीबाबत त्यांनी काही सूचनाही केल्या. त्याचा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी प्रथम विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना आदींच्या प्रतिनिधींशी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात संवाद साधला. या बैठकीस, माजी खासदार श्री विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी जी गोदेपुरे, उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी श्री. पारधी यांचे ग्रंथबुके व शाल देऊन स्वागत केले.
त्यानंतर, कै. अरविंद पेंडसे सभागृहात श्री. पारधी यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात या बैठकीत, महापालिकेतील आरक्षण धोरणाची अंमलबजावणी, पद भरती, वारसा हक्क भरती, पदोन्नती यांचा आढावा उपायुक्त (मुख्यालय) जी जी गोदेपुरे यांनी मांडला. तर, शिक्षण विभागामार्फत अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती, विद्यार्थी संख्या यांची माहिती शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली. दिनदयाळ अंत्योदय योजना तसेच, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजनांच्या अंमलबजावणीबाबत उपायुक्त वर्षा दीक्षित यांनी माहिती दिली.
ठाणे महापालिकेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेमार्फत सार्वजनिक शौचालयांच्या सुधारणेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याची माहिती उपनगर अभियंता विकास ढोले यांनी दिली. हे चांगले पाऊल असून या शौचालयांना पाण्याचा नियमित पुरवठा होईल यासाठी स्वतंत्र विचार करण्यात आला आहे. ही योजना अभिनंदनास पात्र आहे, असे श्री. पारधी म्हणाले.
ठाणे महापालिकेमार्फत अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेतली आहे. त्यातील भरती, पंतप्रधान आवास योजना यांच्याविषयी काही सूचना केल्या आहेत. त्यांची पूर्तता करून त्याचा अहवाल आयोगास पाठविण्यात यावा, असे श्री. पारधी यांनी या बैठकीत स्पष्ट केले. तसेच, कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये असलेले अनुसूचित जातींचे कर्मचारी यांचे पगार वेळेत होतात की नाही, त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो की नाही यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे निर्देशही श्री. पारधी यांनी दिले.
ठाणे महापालिका प्रशासन कार्यक्षम आहे. त्यांच्याकडून विविध योजनांची प्रभावी अमलबजावणी केली जाते. त्यात काही त्रुटी राहील्या असतील तर त्या तत्काळ दूर कराव्यात, असे प्रतिपादन माजी खासदार विनय सहस्र्बुद्धे यांनी केले. तर, माजी खासदार संजीव नाईक यांनी, श्री. पारधी यांनी थेट महापालिकेत येऊन योजनांचा आढावा घेतला याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या या भेटीला महापालिकेनेही त्रुटी दूर करून सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.